महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
पक्ष चिन्ह गोठविण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. याशिवाय पक्ष चिन्हाचा निर्णय तातडीने घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून बंड केलेल्या आमदारांनी शिंदे यांचे नेतृत्वाखाली आपला गट स्थापन करत आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. यावरून ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये रंगलेले युद्ध थेट न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचले. अंधेरी पोट निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविले. आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि ‘मशाल’ निवडणूक चिन्ह दिले तर, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ‘ढाल तलवार’ हे निवडणूक चिन्ह तात्पुरते दिले.
मात्र ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णया विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. न्या. संजीव नरुला यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भात सोमवारी सुनावणी पार पडली होती. उद्धव ठाकरे यांच्या वतीने हायकोर्टासमोर युक्तिवादही करण्यात आला. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगालाही आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र न्यायालयाने ठाकरे गटाची ही याचिका फेटाळून लावली आहे. तर शिवसेनेतील या वादासंदर्भात तातडीने निवाडा करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत.
दिल्ली हायकोर्टाने शिवसेना ठाकरे गटाची याचिका फेटाळल्यानंतर आता ठाकरे यासंदर्भात काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

