महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अल्पवयीन भाचीला आमिष दाखवून अज्ञात कारणासाठी पळवून नेणाऱ्या मामाची संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश यो. प्र. मनाठकर यांच्या न्यायालयाने सोमवारी हा निवाडा केला.
संगमनेर शहरातील पंधरा वर्षीय मुलीस तिच्या मामाने लग्नाचे आमिष दाखवून तिला फूस लावून अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची आणि त्यासाठी आणखी एका आरोपीने मदत केल्याची तक्रार मुलीच्या आईने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात १६ मे २०१९ रोजी केली होती. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कृष्णा विष्णू दिवे आणि किरण शिंदे या दोघांविरोधात अल्पवयीन मुलीचे अपहरण करणे, लग्नाचे अमिष दाखविणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी याप्रकरणी केलेल्या तपासामध्ये पीडित मुलगी मुख्य आरोपीसह आढळून आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकाटे यांनी केलेल्या चौकशी दरम्यान पीडित मुलीने मामाने लग्न करावयाचे असल्याचे सांगून सोबत नेल्यापासून त्याच्यासोबत राहत असल्याचे व त्याच्याशी आलेल्या संबंधातून मुलगा झाल्याची माहिती तपासी अधिकारी कोकाटे यांना दिली. त्यामुळे पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील आरोपीने तिला पळवून नेत तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध करून तिला आई होण्यास कारणीभूत ठरला म्हणून नव्याने बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्ह्यामध्ये वाढीव कलमे लावली होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकाटे यांनी तपास करून मुख्य आरोपीविरोधात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायाधीश यो. प्र. मनाठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. आरोपीच्यावतीने ॲड. राजेश भुतडा यांनी बचाव केला. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही. उलट आरोपीच्या वकिलांनी पीडित मुलगी अल्पवयीन नसून ती एकोणवीस वर्षाची असल्याचे व तिने आरोपी सोबत लग्न केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या खटल्यात चार साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयासमोर नोंदविल्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपीच्या वकिलांचे म्हणणे ग्राह्य धरत न्यायाधीश यो. प्र. मनाठकर यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. ॲड. भुतडा यांना स्वप्निल उपरे यांनी सहाय्य केले.

