महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेच्या वतीने दहा शाळांना शालेय क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
क्रीडा साहित्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती एस. जी. फटांगरे होत्या. जनता शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रामदास राहणे, खजिनदार विठ्ठल कढणे, सह सेक्रेटरी अशोकराव राहाणे, देवगड विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश पावसे, सुभाष गडाख, सुजाता दवंगे, बजरंग पावसे, किरण पावसे, हरीश गडाख आदि यावेळी उपस्थित होते.
स्थायी विकास संस्थेच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या खेळाच्या साहित्यामध्ये क्रिकेट किट, झांज, ढोल, लेझीम, बॅडमिंटन किट, हॉलीबॉल किट, कॅरम बोर्ड अशा 19 प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून दिले. स्थायी विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाळंदे, सचिव डॉ. चंद्रशेखर दिवेकर यांचे यासाठी मोलाचे योगदान लाभले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्थायी विकास संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रदीप दारोळे, मंगल कदम, मंगल काळे, संगीता वराडे, प्रियंका पानमलकर, संभाजी कसबे, सतीश साकोरे यांनी प्रयत्न केले.

