महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : पदव्युत्तर परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास दिली जाणारी तीन सुवर्णपदके एकाचवेळी मिळवत संगमनेर महाविद्यालयातील विद्यार्थी गोपाल सानप याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासात नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. सानप याच्या यशामुळे संगमनेर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी पदव्युत्तर परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास दिले जाणारे कै. प्रमिला दत्तात्रय आलेगावकर सुवर्णपदक, जेष्ठ समीक्षक म. ना. अदवंत स्मृती सुवर्णपदक आणि नामदेव श्रीपती रानवडे स्मृती सुवर्णपदक एकाच वेळी सानप या विद्यार्थ्याने मिळविले आहे.
सानप संगमनेर महाविद्यालयातील मराठी विभागाचा विद्यार्थी असून महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्रामध्ये प्रा. डॉ. अशोक लिंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यावाचस्पती पदवीसाठी महानुभावांच्या सकळ लिपी चिन्हांविषयी संशोधन करत आहे. यापूर्वीही सानप यांनी सेट नेट परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण केल्या आहेत. त्याने तीन सुवर्णपदके मिळविल्याचे विद्यापीठाचे पत्र संगमनेर महाविद्यालयास मिळाले असून वार्षिक पदवीदान समारंभात ही सुवर्णपदके प्रदान केली जाणार आहे.
गोपाल सानप यांना एमए मराठी विषयात शिक्षण घेत असताना डॉ. अशोक लिंबेकर, डॉ. राहुल हांडे, डॉ. बालाजी घारुळे, डॉ. शरद थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. सानप यांच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, व्यवस्थापन मंडळातील सर्व सदस्य, संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. अरुण गायकवाड, मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक लिंबेकर अभिनंदन केले.
अभिमानास्पद! संगमनेर महाविद्यालयातील ‘या’ विद्यार्थ्याने केला सुवर्णपदकाचा विक्रम
संगमनेर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

