महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर
येथील प्रसिद्ध उद्योजक, मालपाणी उद्योग समुहाचे प्रमुख राजेश मालपाणी यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी जिल्ह्यात डोळ्यांसंदर्भात महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या रोटरी क्लब संगमनेर संचलित रोटरी आय केअर हॉस्पिटलसाठी तब्बल २५ लाखांची मदत मालपाणी परिवाराने जाहिर केली आहे.
उद्योजक संजय मालपाणी यांनी ही मदत मालपाणी परिवाराचे वतीने जाहिर केली. मालपाणी परिवाराने दिलेली ही मदत ओपीडी व्हॅनच्या स्वरुपात असणार आहे. ही व्हॅन अत्यंत आधुनिक असून सर्व साधनांनी युक्त अशी असणार आहे. यामुळे आता गावोगावी जाऊन तिथेच रुग्णांना तपासता येणार आहे आणि त्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे की नाही हे सांगता येणार आहे.
याआधी डोळ्यांची तपासणी करून निदान करण्यासाठी नेत्र रुग्णांना संगमनेर येथे यावे लागत होते. आर्थिक परिस्थिती कमकूवत असणाऱ्या कुटुंबांना गावी येऊन उपचार घेणेसुद्धा शक्य होत नव्हते. परंतू आता मालपाणी परिवाराकडून मिळणाऱ्या अत्याधुनिक व्हॅनच्या रूपाने दवाखानाच गावात येणार असल्यामुळे ही अडचण सुटणार आहे.
रोटरी आय केअर निस्वार्थपणे करत असलेल्या कामाची ही पावती असून अशा दानशूर व्यक्तींमुळे अनेक रुग्णांच्या आयुष्य प्रकाशमान झाले आहेत. रोटरी आय केअर संपूर्ण जिल्ह्यात फिरुन मोतिबिंदू झालेल्या रुग्णांना शोधून त्यांचे संगमनेर येथे मोफत उपचार व शस्त्रक्रिया करते, आतापर्यंत या रुग्णालयामार्फत सुमारे ४० हजार मोफत शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.
या मदतीमुळे मालपाणी परिवाराचे मानावे तितके आभार कमी आहेत, अशी प्रतिक्रिया अध्यक्ष संजय राठी यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सर्व रोटरी सदस्य, रोटरी आय केअर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांनी राजेश मालपाणी व परिवाराचे आभार मानले.

