महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते तथा खासदार शरदचंद्रजी पवार हे मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असून, राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी रुग्णालयात जात त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईक विचारपूस केली.
मागील दोन दिवसांपासून खासदार पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहिती समजल्यानंतर राज्यभरातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. पवार साहेबांच्या प्रकृतीबाबत महाराष्ट्रातील जनतेमध्येही काळजी आणि आपुलकीची भावना व्यक्त होत आहे. बाळासाहेब थोरात यांनी काल नाशिक येथील उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत सहभाग घेतल्यानंतर मुंबईकडे प्रयाण केले होते. आज दुपारी त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस करत लवकरात लवकर उत्तम आरोग्य लाभावे व ते पुन्हा पूर्ण क्षमतेने जनसेवेच्या कार्यात रुजू व्हावेत, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
पवार हे देशाच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनातील ज्येष्ठ नेतृत्व असून महाराष्ट्राच्या विकासाच्या विविध टप्प्यांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. विशेषतः शेती, सहकार, ग्रामीण विकास आणि शेतकरी हिताच्या प्रश्नांशी त्यांचा दीर्घकाळ संबंध राहिला आहे. त्यामुळे पवार साहेबांनी लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी सक्रिय व्हावे, अशी भावना थोरात यांनी यावेळी व्यक्त केली.
दिवाळीच्या शुभपर्वाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि अनुभव यापुढेही लाभत राहावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पवार साहेबांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, यासाठी उपस्थितांनी सदिच्छा व्यक्त केल्या असून या भेटीप्रसंगी राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.