महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर तालुका आणि परिसरातील कष्टकरी कामगार वर्ग तसेच त्यांच्या कुटुंबीयांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा सहज व वेळेत उपलब्ध व्हाव्यात, या लोककल्याणकारी उद्देशाने महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीअंतर्गत ‘सेवा दवाखाना’ आणि ‘ईएसआयएस’ (ESIS) कामगार रुग्णालय सेवेचा शुभारंभ रविवारी (२९ नोव्हेंबर) करण्यात येत आहे. या आरोग्यदायी उपक्रमामुळे स्थानिक कामगारांच्या आरोग्य सेवेत नवा अध्याय सुरू होणार आहे.
हा उद्घाटन सोहळा सकाळी नऊ वाजता संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ होणार आहे.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कष्टकरी वर्गाचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि त्यांना दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळावेत, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे. शिवसेनेच्या पुढाकारातून आणि महायुतीच्या माध्यमातून हा सोहळा पार पडत असून, या ऐतिहासिक प्रसंगी कामगार बांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






