महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
बदलते हवामान आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीला आधुनिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.
नाशिक येथे सुरू असलेल्या ‘कृषीथॉन २०२६’ या भव्य कृषी प्रदर्शनाला भेट देऊन विविध आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्टॉल्सची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
यंदाच्या कृषीथॉनचे मुख्य आकर्षण असलेली ‘जलमंथन’ ही पाण्यावर आधारित संकल्पना अत्यंत स्तुत्य असल्याचे आमदार तांबे यांनी नमूद केले. पाण्याच्या योग्य वापरासोबतच खतांचा संतुलित वापर आणि पीक संरक्षणासाठी औषधांची योग्य मात्रा याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असून, कृषीथॉनच्या माध्यमातून हाच मोलाचा संदेश दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
न्याहारकर परिवाराच्या वतीने गेल्या १९ वर्षांपासून कृषीथॉनची ही ज्ञानसमृद्ध परंपरा यशस्वीपणे जपली जात आहे. यंदाच्या प्रदर्शनात ३०० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून, उत्तर महाराष्ट्रातील हजारो शेतकरी, कृषी उद्योजक आणि विशेषतः तरुणांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
कृषीथॉनसारखी प्रदर्शने शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान समजून घेण्याची आणि शेतीपूरक उद्योगांच्या नव्या संधी शोधण्याची संधी उपलब्ध करून देतात. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे एक विश्वासार्ह व्यासपीठ ठरले असून, ही परंपरा भविष्यातही अशीच अधिक व्यापक व्हावी, अशा शुभेच्छा आमदार तांबे यांनी यावेळी न्याहारकर परिवाराला दिल्या.






