महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालक सचिव तथा सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी संगमनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांवर विशेष भर देत, तीव्र टंचाईग्रस्त गावांसाठी गावनिहाय पाणी, चारा आणि संभाव्य चारा छावण्यांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
या पाहणी दौऱ्यात पालक सचिव दराडे यांनी चिंचेवाडी, जांभूळवाडी, खंडेरायवाडी आणि संगमनेर परिसरातील विविध भागांना भेटी दिल्या. सर्वप्रथम चिंचेवाडी येथील शासनाच्या पाझर तलावाची पाहणी केल्यानंतर, त्यांनी जांभूळवाडी येथील शेतकरी ज्ञानदेव सुभाष शिंदे यांच्या जनावरांच्या गोठ्याला भेट देऊन उपलब्ध चारा साठा व पिकांची पाहणी केली. तसेच शासनाच्या गट क्रमांक ८६८ आणि ८७४ येथील संभाव्य चारा छावणीसाठी प्रस्तावित जागेची तपासणी केली.
यानंतर खंडेरायवाडी गावठाण येथील टँकरद्वारे पाणी साठवणुकीच्या टाकीची पाहणी करून, त्यांनी शेतकरी पांडुरंग बाळकृष्ण तळेकर यांचे शेततळे व रब्बी हंगामातील जळून गेलेल्या पिकांची, तसेच शेतकरी अण्णासाहेब भाऊसाहेब ढेरंगे यांच्या शेतातील पाण्याअभावी खराब झालेल्या कांदा पिकाची प्रत्यक्ष पाहणी करत नुकसानीचा आढावा घेतला.
दौऱ्यादरम्यान पालक सचिव दराडे यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत पिण्याच्या पाण्याची टंचाई, टँकरद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता, पिकांचे नुकसान आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. गावातील पशुधनाची संख्या लक्षात घेऊन आवश्यक चारा, पाणी आणि गरज भासल्यास चारा छावण्यांच्या जागांची निवड आत्ताच करून ठेवण्याची सूचना त्यांनी केली.
या संपूर्ण पाहणी दौऱ्यातून समोर आलेली दुष्काळी भागातील वस्तुस्थिती आणि सविस्तर अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात येणार असून, त्यानुसार तातडीने पुढील उपाययोजना राबवल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यावेळी शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप खंडेराव आणि तालुका कृषी अधिकारी श्रीमती रेजा बोडके यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.






