सरकारी कार्यालयांमध्ये एखाद्या गरीब, गरजू व्यक्तीचे काम अडले असेल, तर त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी स्वतः अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांचे काम मार्गी लावणारे अजिजभाई शेख एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. सर्वसामान्य माणसाच्या अडचणी समजून घेऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हेच त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते.
काँग्रेस पक्षात फूट पडली, राजकीय परिस्थिती बदलली, अनेकांनी आपापल्या सोयीने भूमिका बदलल्या; परंतु अजिजभाई शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी कधीही सत्ता, पैसा किंवा पदाचा हव्यास केला नाही. राजकारणात राहूनही स्वतःचा स्वाभिमान आणि तत्त्वनिष्ठा त्यांनी कधीही सोडली नाही.
त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद कामगिरी म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच संपूर्ण नगरपालिका काँग्रेसच्या पंजा या निवडणूक चिन्हावर निवडून आणण्याचा इतिहास त्यांनी घडवला. एवढे मोठे राजकीय यश मिळवूनही त्यांनी कधीही लाचारी किंवा चाटुगीरी स्वीकारली नाही. कोणापुढेही स्वार्थासाठी मान झुकवली नाही. ताठ मानेने जगणे आणि स्वाभिमानाने राजकारण करणे, हा त्यांचा जीवनमंत्र होता.
राजकीय जीवनाइतकेच त्यांचे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनही आदर्श होते. भाऊ, बहीण, आई-वडील यांची सेवा आणि जबाबदारी त्यांनी मनापासून पार पाडली. शेजारी आणि समाजातील लोकांशी नेहमीच आपुलकीचे संबंध ठेवले. कधीही कोणाशी भांडण, तंटा किंवा विनाकारण वाद निर्माण केला नाही. माणुसकी जपणे आणि नाती जपणे याला त्यांनी नेहमीच महत्त्व दिले.
अजिजभाई यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वाभिमान, निष्ठा, कणखरपणा, निस्वार्थी समाजसेवा आणि माणुसकी यांचा सुंदर संगम होता. त्यांनी आपल्या आयुष्यातून एक गोष्ट शिकवली की, राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसते, तर ते सामान्य माणसाच्या मदतीसाठी आणि समाजाच्या हितासाठी असले पाहिजे.
आज ते आपल्यात नाहीत, ही गोष्ट मनाला चटका लावणारी आहे. मात्र त्यांनी केलेली समाजसेवा, त्यांचे विचार, त्यांची तत्त्वनिष्ठा आणि त्यांनी जपलेला स्वाभिमान कायम स्मरणात राहील.
अशा या गरिबांच्या कैवारी, निष्ठावंत काँग्रेसप्रेमी, कणखर आणि स्वाभिमानी नेतृत्वाला भावपूर्ण व विनम्र श्रद्धांजली!







