महाराष्ट्र संवाद न्यूज
ग्रामीण रुग्णालयातील महिला परिचारिकेशी केलेले असभ्य वर्तन कोपरगांवच्या तहसीलदारांच्या चांगलेच अंगलट आले असून आपल्या वर्तनाने कहर करणाऱ्या तहसीलदार बोरुडे यांच्यावर कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिचारिकेने दिलेल्या फिर्यादीवरुन आता तहसीलदारांविरोधात हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत असून पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत दाते पुढील तपास करत आहे.
दरम्यान या प्रकरणी तहसीलदार बोरुडे यांच्यावर पोलीस आणि प्रशासन काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. कोपरगाव तहसील कार्यालयाचे दंडाधिकारी विजय बोरुडे यांनी शनिवारी ग्रामीण रुग्णालयात अचानक प्रवेश करून तेथील दरवाजा जोरजोराने ठोठावून तेथील पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तेथील परिचारिकेशी व तेथील महिला रुग्णाच्या नातेवाईक तरुणीशी असभ्य वर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने कोपरगाव शहरासह जिल्हयातच नव्हे तर राज्याच्या महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील हा ‘राडा’ तेथील अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ लोकप्रतिनिधी, वरिष्ठ महुसल अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिला असल्याचे समजते. तर राज्याचे महसूल मंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देखील या संदर्भात तक्रार करण्यात आल्याची माहीती पुढे येत आहे. त्यामुळे तहसिलदारांवर आता काय कारवाई होते, हे समोर येईल.
दरम्यान कोपरगाव येथे तहसीलदार यांनी कर्मचारी व अधिकारी यांच्याशी केलेल्या अपमानास्पद वागणूक व शिवीगाळ बाबत सर्व कर्मचारी संघटना व लिपीक हक्क परिषद तसेच मध्यवर्ती संघटना यांचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी यांनी अहमदनगर येथे निषेध केला व संबधित तहसीलदार यांच्यावर कार्यवाही न झाल्यास सोमवार पासून सर्व कर्मचारी कामबंद करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
चक्क महसुल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच ही घटना घडली असून त्यामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित तहसीलदार बोरुडे यांच्या वर काय कारवाई वरिष्ठ करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

