महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर:
शे-दोनशे, हजार-दोन हजार नव्हे तर तब्बल एक लाखाची लाच घेताना नगरच्या सहकारी संस्थेच्या विशेष लेखापरीक्षकासह खाजगी लेखापरीक्षक अँटी करप्शनच्या सापळ्यात अडकला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्याच्या सहकार विभागातील मोठी लाचखोरी समोर आली आहे.
किसन दिंगबर सागर, वय ५५, विशेष लेखापरीक्षकाचे व तय्यब वजीर पठाण वय ४८, असे लाखाच्या पटीत लाचखोरी करणाऱ्या खाजगी लेखा परीक्षकाचे नाव आहे. अँटी करप्शनच्या नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर अँटी करप्शनचे पोलीस उपाधीक्षक तथा सापळा अधिकारी हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पोलीस हवालदार हरुन शेख, चालक पोलिस हवालदार दशरथ लाड यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
या संदर्भात अधिक माहिती अशी, नेवासा खुर्द येथील तक्रारदार व्यक्ती एका पतसंस्थेची अध्यक्ष होती. या पतसंस्थेचे लेखा परीक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी आरोपी लोकसेवक सहकारी संस्थेचे लेखा परीक्षक किसन दिंगबर सागर यांना दिले होते. लेखापरीक्षक सागर यांनी तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावरील मुदत ठेवीचे रक्कम व्याजासह अहवालामध्ये दर्शविण्यासाठी तसेच लेखा परीक्षण अहवाल चांगला सादर करण्यासाठी तक्रारदाराकडे तीन लाख रुपये लाचेची मागणी केली होती.
यासंदर्भात तक्रारदाराने अहमदनगर अँटिकरप्शन विभागाशी संपर्क साधत तक्रार केली होती. त्यामुळे अँटी करप्शन विभागाने १७ मार्च रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच पडताळणी मध्ये लेखापरीक्षक सागर याने खाजगी लेखापरीक्षक तय्यब वजीर पठाण याच्या उपस्थितीमध्ये तडजोडीअंती दोन लाख रुपयांची मागणी केली. लाचेच्या मागणीसाठी पठाण याने देखील प्रोत्साहन दिले होते.
आरोपींनी मागणी केलेल्या दोन लाखाच्या रकमेपैकी पहिल्या टप्प्यात तक्रारदाराने एक लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. सोमवारी तक्रारदाराकडून नेवासा फाटा येथील बाळूमामा जूस सेंटर मध्ये लाचेची रक्कम स्वीकारताना अँटीकरप्शनच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले. पकडलेल्या दोन्ही आरोपींविरोधात पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती अँटी करप्शनकडून देण्यात आली.

