महाराष्ट्र संवाद न्यूज
सुरतच्या न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर गुजरात मधील नवसारी न्यायालयाचा आणखी एक निकाल समोर आला आहे या न्यायालयाने काँग्रेस आमदार अनंत पटेल यांना शिक्षा सुनावली आहे. आमदार पटेल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो फाडला म्हणून 99 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास त्यांना सात दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
आमदार अनंत पटेल यांच्यासह आणखी काही विद्यार्थ्यांनी 2017 मध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नवसारी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयात घुसून गैरवर्तन आणि कुलगुरूंच्या टेबलावर ठेवलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो फाडल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
आमदार पटेल यांच्यासह युवक काँग्रेसच्या सदस्यांसह इतर सहा जणांवर आयपीसी कलम 143 (बेकायदेशीर सभा), कलम 353 (हल्ला), कलम 427 (नुकसान करणे), कलम 447 (गुन्हेगारी घुसखोरी) आणि 504 (हेतूपूर्वक अपमान) या कलमानुसार मे 2017 मध्ये जलालपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. नवसारी येथील न्यायालयात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. ए. धदल यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती.
न्यायालयाने वंसदा अनुसूचित जाती मतदारसंघाचे आमदार अनंत पटेल यांच्यासह तीन आरोपींना गुन्हेगारी स्वरूपात दोषी ठरविले आणि त्यांना 99 रुपये दंड जमा करण्याचे आदेश दिले आहेत. दंड न भरल्यास आरोपींना सात दिवसांचा कारावास भोगाव लागणार आहे.

