महाराष्ट्र संवाद न्यूज
जनावरांचा रस्ता का अडवीला, अशी विचारणा करणाऱ्या सख्या भावाच्या डोक्यात मुलाच्या मदतीने खोऱ्याने मारत त्याचा खून करणाऱ्या बाप-लेकाला अकोले पोलिसांनी अटक केली.
अकोले तालुक्यातील केळी कोतुळ येथील गोडेवाडीमध्ये ही घटना घडली. मनोहर सावळेराम लेंभे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून मयताची पत्नी सोनाबाई मनोहर लेभें (वय ४०) रा. गोडेवाडी, केळी-कोतुळ ता. अकोले यांनी या संदर्भात अकोले पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश सावळेराम लेंभे, राजाराम उर्फ राहुल सुरेश लेंभे या बाप-लेका विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी (ता. १६ एप्रिल) सायंकाळच्या वेळी शेतातील जनावरे दीर सुरेश सावळेराम लेंभे यांच्या रिकाम्या शेतातून घेऊन जात असताना लेंभे यांनी ‘माझ्या शेतातून जनावरे न्यायची नाहीत’, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळाने ही बाब फिर्यादीने आपला पती कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना सांगितले असता मनोहर लेंडे हे या संदर्भात विचारणा करण्यासाठी आपल्या भावाकडे गेले.
भावाने रस्ता अडविण्याच्या कारणावरून विचारणा केल्याचा राग आल्याने सुरेश लेभे याने भाऊ मनोहर सावळेराम लेभे यांच्याशी झटापट करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान जवळच असलेल्या पुतण्या राजाराम उर्फ राहुल लेंभे याने हातात खोरे घेऊन येत ते आपल्या चुलता मनोहर लेंभे यांच्या डोक्यात तीन चार वेळा मारले. डोक्यात झालेल्या जोराच्या प्रहारमुळे लेंभे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले होते.
मयताची पत्नी सोनाबाई लेंभे यांच्या फिर्यादीवरुन अकोले पोलिसांनी भाऊ आणि चुलत्याचा खून केल्याप्रकरणी मृताचा भाऊ सुरेश लेंभे व पुतण्या राजाराम उर्फ राहुल लेंभे याच्या विरूद्ध भा.द.वी. कलम ३०२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी बापलेकास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक सुभाष भोये करत आहे.

