संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
नव्या पोलीस निरीक्षकांच्या काळात संगमनेरात कायद्याचा धाक निर्माण होईल ही सामान्य नागरिकांच्या अशा फोल ठरली आहे. शहराच्या विविध भागात आणि बस स्थानकामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मात्र पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची माहिती माध्यमांपासून लपवून ठेवण्याचा आटापिटा पोलीस यंत्रणे कडून सुरू आहे.
पोलिसांच्या लेखी फक्त कागदपत्रे गस्त असलेल्या संगमनेरच्या दक्षिणेकडील बहुवस्ती असलेल्या भागात मंगळवारी रात्री चोरट्यांनी उच्छाद मांडला. या भागातून जवळपास चार घरफोडीचे प्रकार समोर आले आहेत. यामध्ये चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात मुद्देमाल लंपास केला असून पोलिसांच्या दप्तरी मात्र किरकोळ मुद्देमाल दाखवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घोडेकर मळ्यातील भरगच्च लोकवस्तीतील अर्जुन काठे यांच्या घरी चोरीचा प्रकार समोर आला आहे. काठे बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराकडे मोर्चा वळविला होता. शेजारीच त्यांचे भाऊ सयाजी काठे राहण्यास आहे. चोरट्यांनी त्यांच्या घराला बाहेरून कडी लावत अर्जुन काटे यांच्या बंद घराचा दरवाजा तोडत घरातील कपाटातून रोकड रकमेसह दागिन्यांची चोरी केली. नेमका किती मुद्देमाल चोरीस गेला हे अद्याप समोर आलेले नाही. याशिवाय लगतच्याच पंपिंग स्टेशन येथे ज्ञानेश्वर हजारे, कासारवाडी शिवारात देखील चोरट्यांनी ब्युटी पार्लरचे दुकान, आणि आणखी एका बंद घराचे कुलूप तोडत उचकापाचक केल्याचे समोर येत आहे.

