कोपरगाव (महाराष्ट्र संवाद न्यूज)
कोपरगाव तालुक्यातील जवळके-धोंडेवाडी चौफुलीवर दुचाकी आणि कंटेनरच्या अपघातामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली असून जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संगमनेर कडे जाताना या दांपत्याचा अपघात झाला.
अशोक विठ्ठल गुंड (वय 58 वर्ष) व शोभा अशोक गुंड (वय 53 वर्ष रा. जळगाव, ता. राहाता, जि. अहमदनगर) हे दांपत्य शनिवारी (ता. 13 मे) सकाळी संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे नातेवाईकांकडे दुचाकीवरून जात असताना साडे आठ वाजण्याच्या दरम्यान जवळके-धोंडेवाडी चौफुलीवर रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने त्यांना जोराची धडक दिली.
या अपघातामध्ये अशोक गुंड यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी शोभा गुंड या गंभीर जखमी झाल्या. अपघातस्थळी आलेल्या स्थानिक नागरिक व प्रवाशांनी दोघांनाही तातडीने उपचारासाठी शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच अशोक गुंड यांचा मृत्यू झाला होता.
तर शोभा गुंड यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना अत्यवस्थ अवस्थेत पुढील उपचारासाठी लोणीच्या प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

