संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करून तिला गरिबांसाठीच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे अमिष दाखवून तिच्याजवळील पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ‘सय्यद’ नावाच्या चोरट्याने लांबविण्याचा प्रकार गुरुवारी दुपारी पोलीस ठाण्यासमोरील कुदळ मिसळ समोर घडला.
पद्मा कांतीलाल चोरडिया (वय 75 वर्ष, रा. साकुरी, ता. राहाता) या महिलेने या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सय्यद (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी, वृद्ध महिला बाभळेश्वर येथून संगमनेरला येण्यासाठी एसटी बसमध्ये बसली होती. याचवेळी तिच्यासोबत एक अनोळखी इसम बसमध्ये बसून प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याने आपले नाव सय्यद असल्याचे या महिलेला सांगत तिचा विश्वास संपादन केला. संगमनेरला बस स्थानकावर उतरल्यानंतर त्याने या महिलेला संगमनेरच्या सेतू कार्यालयातून गरिबांसाठीच्या योजनेचा लाभ मिळवून देतो असे सांगून तिला तहसील, शहर पोलीस स्टेशन बाहेरील सेतू कार्यालयाजवळ आणले होते.
या परिसरातील कुदळ मिसळ दुकान च्या बाहेर हे दोघे आले असताना सेतू कार्यालयातील अधिकाऱ्यांसमोर आपली परिस्थिती गरिबीची आहे, हे दाखवावे लागेल असे सांगत त्याने या महिलेला तिच्या जवळील दागिने काढून ठेवण्यास सांगितले. त्यामुळे महिलेने आपल्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन, सुमारे 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील फुले व वेल तसेच पाच हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून ठेवली.
संधीचा फायदा घेत महिलेचा विश्वास संपादन केलेल्या ‘सय्यद’ने हे दागिने घेऊन तेथून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने शहर पोलीस ठाण्यातील या संदर्भात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सय्यद नावाच्या अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार करीत आहेत.

