महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – गुन्हा करण्याच्या उद्देशाने विनापरवाना २१ इंच लांबीची गुप्ती जवळ बाळगणाऱ्या चार जणांना संगमनेर तालुक्यातील शिवारामध्ये वडगाव पान ते तळेगाव रस्त्याच्या पाटावर करुले शिवारात पकडण्यात आले आहे. आरोपी पैकी तिघेजण बुलढाणा जिल्ह्यातील असून एक आरोपी संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील आहे.
कैलास अशोक सावंत (वय २४ वर्ष), मारुती बळवंत सावंत (वय ७० वर्ष, दोन्ही रा. मु. गोसिंग गाव, पोस्ट नांदुरा, जि. बुलढाणा), राजू रावसाहेब शिंदे (वय २३ वर्ष, रा. मुंबरा पो. बोरजवळा ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि जितेश भाऊसाहेब गोडे (वय २४ वर्ष, रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर, सर्व हल्ली रा. समनापुर, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे असून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चारही आरोपी गुन्हा करण्याच्या उद्देशाने आढळून आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ पोलिसांना विनापरवाना बाळगलेली २१ इंच लांबीची गुप्ती आढळून आली. यासंदर्भात शुक्रवारी दुपारी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस नाईक बाबासाहेब महादेव खेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चारही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे करीत आहेत.

