महाराष्ट्र संवाद न्यूज
“तुझा लवकरच नरेंद्र दाभोळकर होणार”, अशी धमकी शरद पवारांना देणाऱ्या सागर बर्वेच्या मुंबई पोलिसांनी पुण्यातून मुसक्या आवळल्या आहे. बर्वे ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाने फेसबुक पेज चालवत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दोन दिवसांपूर्वी देण्यात आली होती. राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून ही धमकी देण्यात आली होती. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. “शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार”, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली होती.
फेसबुक आणि ट्विटरवर शरद पवार यांनी धमकी मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या होत्या. त्यांनी पोलीस आयुक्तांना भेटून या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. उपमुख्यमंत्री अन् गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना त्वरीत कारवाईचे आदेश दिले होते.
आता पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी पुणे शहरातून सागर बर्वे (३४) याला अटक करण्यात आली. त्यानेच दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांना ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या फेसबुक पेजवरुन ‘तुमचा लवकरच दाभोलकर करू’ अशी धमकी दिली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाचे फेसबुक पेज पुण्यातील इंजिनिअर सागर बर्वे चालवत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला अटक केली. सागर बर्वे हा आयटी इंजिनिअर आहे. 

