महाराष्ट्र संवाद न्यूज
शेवगावमधील (अहमदनगर) बालाजी मंदिरासमोर असलेल्या भर वस्तीमध्ये वास्तव्यास असलेले भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन बलदवा कुटुंबीयांच्या घरावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोघा जणांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
दरोडेखोरांच्या मारहाणीत अहमदनगर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे उपाध्यक्ष गौरेश बलदवा यांच्या मातोश्री पुष्पाताई आणि चुलते गोपीकिशन बलदवा यांचा मृत्यू झाला असून चुलती सुनिता यांना दरोडेखोरांनी वीट फेकून मारल्याने त्यांच्या डोक्याला देखील मार लागला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी किमती ऐवज चोरून नेल्याची माहिती समोर येत आहे.
दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बघून शेवगावकरांमध्ये हळहळ व्यक्त होत होती. अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मनेश बाहेती व माजी सह-मंत्री विजय दरक यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश ओला व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी घटनास्थळी दाखल झाले आहे.

