महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – ‘तुला घरी सोडतो’, असे सांगत साडेबारा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपी विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र पसार झाला आहे.
पंकज शरद डुबे (रा. पेमगिरी, ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर) असे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात भारतीय दंडविधान कलम 376(3), 363, 366(अ) व बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातील परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने पुढील तपास करत आहेत.
अधिक माहिती अशी, शुक्रवारी (ता. 14 जुलै) आरोपी पंकज शरद डुबे याने पीडित मुलीला तुला घरी सोडतो असे सांगत आपल्या दुचाकीवर बसवून थेट पेमगिरी ते शिरसगाव धुपे रोडवरील संगमनेरकरांचे धार्मिक श्रद्धास्थान असलेल्या बाळेश्वरच्या मंदिराजवळील घाटाच्या खाली असलेल्या झाडाझुडपात सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान जबरदस्तीने तिच्या अंगावरील कपडे काढून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.
त्यानंतर संध्याकाळी आरोपीने पीडित मुलीला घरी नेऊन सोडले. घाबरलेल्या पीडितेने याची घरी कोणालाही कल्पना दिली नाही. मात्र घटनेच्या चौथ्या दिवशी तिने घरच्यांना या प्रकाराबाबत माहिती दिल्यानंतर तिच्या घरच्यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यामुळे त्यांनी मंगळवारी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात येत पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तातडीने आरोपी पंकज डुबे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने या प्रकरणात मोटरसायकलचा वापर केल्याचे समोर आले आहे.

