महाराष्ट्र संवाद न्यूज
नाशिक – समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार च्या झालेल्या अपघातात श्रीरामपूर मधील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्याचा समावेश आहे. अपघातग्रस्त कारमध्ये एक लाख साठ हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे.
श्रीरामपूर रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी श्रीकांत थोरात हे एम.एच. १४ ई.वाय- ७१९८ या क्रमांकाच्या स्विफ्ट कार मधून चालक हर्षल भोसले यांच्यासोबत इगतपुरी येथील भरवीर इंटरचेंज वरून समृद्धी महामार्गावर शिर्डीच्या दिशेने येत होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने या कारला अपघात झाला.
किलोमीटर क्रमांक ५६० वर आल्यानंतर या कारने तीन-चार पलट्या खात कार दुभाजकाच्या साईड बॅरिकेटला धडकून दोन्ही लेनच्या मधोमध जाऊन पडली होती. अपघाताची माहिती मिळताच गोंदे इंटरचेंज येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे कर्मचारी, वावी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शैलेश शेलार, देविदास माळी अपघात स्थळी पोहोचले.
कार मधील दोन्ही जखमींना बाहेर काढत टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र तत्पूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कारमध्ये आढळून आलेली एक लाख साठ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली असून खातरजमा केल्यानंतर ती संबंधितांच्या नातेवाईकाकडे देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

