महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई : वारकरी संप्रदायाला मोठा धक्का पोहोचणारी बातमी समोर आली आहे. आपल्या अनोख्या कीर्तन शैलीने लाखो जनतेवर गारुड करणाऱ्या ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
कीर्तनकार बाबा महाराज सातारकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. नवी मुंबईतील नेरूळ येथे त्यांनी गुरुवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला.
बाबा महाराज सातारकर यांनी बांधलेल्या नेरूळ जिमखानाच्या समोरील विठ्ठल रखुमाई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर नेरूळच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव असून ५ फेब्रुवारी १९३६ रोजी त्यांचा जन्म नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या बाबा महाराज सातारकर यांच्या घराण्यात तीन पिढ्यांपासून कीर्तन व प्रवचनाची परंपरा आहे. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जाते.
वृद्धापकाळ आणि प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या काही दिवसापासून बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम कमी झाले होते. त्यांची कीर्तन परंपरा त्यांचा नातू पुढे चालवत आहे.
दरम्यान कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्म आणि भागवत संप्रदायाचा विचार देश विदेशासह समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असल्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्म आणि भागवत संप्रदायाचा विचार देश विदेशासह समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवणारे ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/ztDzsNhVIu
— Balasaheb Thorat (@bb_thorat) October 26, 2023



