पुणे – ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर शनिवारी पुण्यात हल्ला करण्यात आला होता. तसेच भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन देखील करण्यात आले याप्रकरणी पुणे पोलिसांनी भाजपचे शहाराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह ४३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पत्रकार निखील वागळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, वकील असीम सरोदे यांचा ‘निर्भय बनो’ कार्यक्रम पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयात शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जात असताना निखील वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली.
निखील वागळे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी निखील वागळे यांच्या पुण्यातील निर्भय बनो कार्यक्रमाला विरोध केला होता. दांडेकर पुलाजवळील राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयाबाहेर भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते. त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे पोलिसांनी वागळे यांना या कार्यक्रमासाठी न जाण्याचा सल्ला दिला होता. पोलिसांनी निखील वागळे, असीम सरोदे यांना चार तास बसवून ठेवलं होतं. मात्र वागळे यांचा कार्यक्रमाला जाण्याचा निर्धार कायम राहिला. ते कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असताना दबा धरून बसलेल्या भाजप कार्यकर्त्यांकडून झालेल्या या हल्ल्यात वागळे व त्यांचे सहकारी बचावले. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी या हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान झाले होते.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता. हल्ल्याच्या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांवर पुण्याच्या पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

