गुरुवार, दि. ३० मे
प्रवरा नदी पात्रात मित्रांसमवेत पोहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रात बळी जाण्याची मालिका अद्याप सुरूच असल्याचे यातून समोर आले.
अविनाश पाराजी जोगदंड (वय १५ वर्षे, रा. कोल्हार भगवतीपुर) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. स्थानिक नागरिक आणि आपत्ती दलाच्या जवानांनी राबविलेल्या पाच तासाच्या शोध मोहिमेत याचा मृतदेह नदीपात्राच्या कपारीत आढळून आला. अविनाश जोगदंड हा आपल्या मित्रांसोबत बुधवारी कोल्हार-बेलापूर रस्त्यालगत असलेल्या बागमळ्याच्या मागील बाजूस असलेल्या प्रवरा नदी पात्रात होण्यासाठी गेला होता.
अविनाशचा नदीपात्रातील गाळात अथवा कपारीत अडकून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अविनाश हा बीड जिल्ह्यातील असून तो आपल्या काका मावशीकडे कोल्हार (भगवतीपुर) येथे निर्मल नगरमध्ये राहत होता. नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षांच्या निकालानंतर तो नववीतून दहावीमध्ये गेला होता, मात्र तत्पूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातला.


