शनिवार दिनांक १५ जून २०२४
शनिवारी दुपारी शेततळ्यात बुडून तीन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ आज पुन्हा दुसरी घटना तालुक्यात मेंढवन या गावात घडली आहे.
अनुष्का सोमनाथ बडे (वय ११ वर्ष), सृष्टी उत्तम ठापसे (वय १३ वर्ष) आणि वैष्णवी अरुण जाधव (वय १२ वर्षे) अशी मृत झालेल्या तिन्ही मुलींची नावे आहेत.

तिघीजणी शनिवारी दुपारी शाळेतून सुटल्यानंतर घरी आल्या होत्या. दुपारी जेवण करून त्या सोमनाथ बडे यांच्या शेतात असलेल्या शेततळ्याजवळ गेल्या होत्या. अर्धवट काम सुरू असलेल्या या शेततळ्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. पाण्यात खेळण्यासाठी गेलेल्या या मुलींचा खोलगट भागात असलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. तीनही मुलींचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढून घुलेवाडी (संगमनेर) येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पाटील यांनी दिली आहे.



