सोमवार, १२ ऑगस्ट
अहमदनगर :- २६ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातून सोमवारी दुपारी तीन वाजता पाणीसाठा नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने २ हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. त्यामुळे मुळा नदीकाठच्या गावांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले आहे.
आजघडीला धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार लोअर गाईड व अप्पर गाईड कर्व्हनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सोमवारी (१२ ऑगस्ट) नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार आहे.
त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रातील चल मालमत्ता, चीजवस्तु, वाहने, पशुधन, शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जिवित व वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


