शुक्रवार, ०८ नोव्हेंबर
संगमनेर – कुटुंबीयांकडे बघून शिवीगाळ करणाऱ्या दारूच्या नशेतील तरुण आणि त्याच्या दहा-पंधरा साथीदारांनी कुटुंबीयांना मारहाण केल्याचा तसेच हाउसिंग सोसायटी मधील वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्याचा प्रकार गुरुवारी रात्री संगमनेरच्या घुलेवाडी शिवारातील एकता चौकात घडला आहे.
या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात योगेश मदनलाल तिवारी (वय ४३ वर्ष, रा. कंचन कम्फर्ट हाऊसिंग सोसायटी, एकता चौक, घुलेवाडी, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सागर राऊत व त्याच्या दहा-पंधरा साथीदार मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, योगेश तिवारी यांचा गोंदेफाटा, सिन्नर जि. नाशिक येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तसेच ते शहरालगतच्या घुलेवाडी येथील एकता चौकातील कांचन कम्फर्टमध्ये कुटुंबीयांसह राहतात. गुरुवारी सकाळी ते त्यांच्या मालकीची कार सर्विसिंगला देण्यासाठी अहिल्यानगर येथे गेले होते. तेथून ते एसटी बसने पत्नी, मावस भाऊ यांच्या समवेत रात्री साडेनऊच्या सुमारास संगमनेरला परतले होते.
बस स्टँडवरून पत्नी, मावस भावासह रिक्षातून ते घरी परतत असताना घराजवळ रिक्षातून उतरताना समोर दारू पिलेल्या अवस्थेत असलेल्या व्यक्तीने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिवारी यांच्या मावस भावाने त्यांना समोरची व्यक्ती दारू पिलेली आहे त्याच्या नादी लागू नको असे सांगितले. त्यामुळे समोरच्या व्यक्तीने तिवारी यांच्याकडे येत सर्वांना शिवीगाळ सुरू केली. तसेच मला दारू पिलेला आहे असे का म्हटले याचे विचार ना करत तिघांनाही लाथा बुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तिवारी यांनी त्याला तिथून निघून जाण्यास सांगितले असता त्याचा राग आल्याने त्याने मोबाईल फोनवरून त्याच्या मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले. तेथे आलेल्या त्याच्या दहा ते पंधरा मित्रांनी योगेश तिवारी यांच्यासह त्यांची पत्नी व मावस भाऊ यश उपाध्ये यांना लाथा बुक्क्याने मारहाण केली.
यावेळी तेथे हाउसिंग सोसायटीमधील इतर जमा झाल्याने सागर राऊत आणि त्याच्या अनोळखी मित्रांनी सोसायटीमधील पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या टू व्हीलर, फोर व्हीलर वाहनांच्या दगडाने काचा फोडून नुकसान केले. तसेच तक्रारदाराला सोसायटी मधून कसे बाहेर येतात तेच बघतो अशी धमकी दिली. 
या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सागर राऊत व दहा ते पंधरा अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९०, १९१(२), ११५, ३५२, ३५१(२), ३२४(४), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१), ३७(३) व १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव पुढील तपास करत आहे.

