महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहरात छापा टाकून कत्तलीच्या उद्देशाने क्रूरपणे डांबून ठेवलेल्या तब्बल २५ गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. या धडक कारवाईमुळे अवैध गोवंश कत्तल करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड आणि पथकातील अंमलदार गणेश लोंढे, गणेश धोत्रे, अभिजीत अरकल, रणजीत जाधव, अमृत आढाव, सतीष भवर, विशाल तनपुरे व योगेश कर्डीले यांना संगमनेर परिसरात अवैध धंद्यांची कसून माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार बुधवारी (२८ ऑक्टोबर) हे तपास पथक संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना, जमजम कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ आणि मोना प्लॉट परिसरात काही जणांनी गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे बांधून ठेवल्याची पक्की गोपनिय माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी पथकाने पंचासमक्ष तात्काळ संबंधित ठिकाणावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी नदीम रेहमान कुरेशी (वय ३९, रा. मदीनानगर, संगमनेर) आणि राजमोहम्मद आरिफ सय्यद (वय ४०, रा. मदीनानगर, संगमनेर) या दोन संशयितांना जागीच ताब्यात घेतले. त्यांच्याकडे जनावरांच्या मालकी हक्काबाबत कसून चौकशी केली असता, ही जनावरे लाला रफीक कुरेशी, जहीर अन्वर कुरेशी आणि शमसू कुरेशी यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली. हे तिन्ही मुख्य आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले.
पोलिसांनी घटनास्थळावरून पाच लाख तीस हजार रुपये किमतीची लहान-मोठ्या गायी, गोऱ्हे आणि कालवडी अशी एकूण २५ मुकी जनावरे सुरक्षितपणे ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ चे सुधारित २०१५ चे कलम ५(अ), ५(ब), ९ तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे.