महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दैनिक युवावार्ता, युवा पॉलिप्रिंट आणि युवा उद्योग समूहाचे संचालक सुदीप किसन हासे यांनी ओरिएंटल विद्यापीठ, इंदोर येथून संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विषयात पीएच.डी. यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. व्यवसायाची मोठी जबाबदारी समर्थपणे सांभाळत त्यांनी मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंग या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात हे उल्लेखनीय संशोधन यश संपादन केले आहे.
डॉ. सुदीप हासे यांनी “Design and Analysis of Cloud Deployed Intelligent Analysis of Real Time Twitter Data (TSaaS)” या विषयावर आपले संशोधन सादर केले. या संशोधनादरम्यान त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डीप लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगवर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांच्या या संशोधनकाळात नामांकित स्कोपस इंडेक्स्ड जर्नल्समध्ये चार संशोधन लेख, तीन स्कोपस परिषदांमध्ये शोधनिबंध, एक पुस्तक आणि एक पुस्तकातील प्रकरण (बुक चॅप्टर) प्रकाशित झाले आहे.
यापूर्वी ईएसडीएस (ESDS) सॉफ्टवेअर सोल्यूशन्स या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत व्यावसायिक अनुभव घेतल्यानंतर त्यांनी अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आठ वर्षे प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. विशेष म्हणजे, त्यांनी बी.ई. आणि एम.ई. या दोन्ही पदव्यांमध्ये महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला होता. आयटी क्षेत्रातील व्यावसायिक अनुभव आणि शैक्षणिक क्षेत्रातील रुची या दोन्हीचा मेळ घालत त्यांनी हे संशोधन पूर्ण केले.
त्यांच्या या संशोधन कार्यासाठी मार्गदर्शक डॉ. मेघा सिंग, विभागप्रमुख डॉ. अतुल अगरवाल, डॉ. ममता मीना, रिसर्च डीन डॉ. धीरज नीम, अभियांत्रिकी डीन डॉ. शैलेंद्र सिंग आणि प्रो-चान्सलर डॉ. ध्रुव घई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. सुदीप हासे यांनी वडील किसन भाऊ हासे व आई सुशीला किसन हासे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाल्याचा विशेष आनंद व्यक्त केला. व्यवसाय, समाजसेवा आणि संशोधन यांचा समतोल साधत मिळवलेल्या हासे यांच्या या यशामुळे संगमनेरच्या शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.