महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक आणि कामगार यांच्या हिताला प्राधान्य देण्याची परंपरा जपणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने अपघाती मृत्यू झालेल्या सभासदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. कारखान्याच्या वतीने सभासदांचा प्रत्येकी दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला असून, या विमा संरक्षणांतर्गत अपघातात मृत्यू झालेल्या सभासदांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीत हा कार्यक्रम झाला. यावेळी आंबी खालसा येथील कै. सुखदेव नामदेव गाडेकर, राजापूर येथील कै. माधव हासे आणि वडगाव पान येथील कै. मनाजी रेवजी थोरात यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. याशिवाय चौथ्या मृत सभासदाच्या वारसालाही या योजनेंतर्गत दोन लाख रुपयांची मदत देण्यात आली.
या वेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, नाना शहाजी दिघे यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी आणि विविध गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.