महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरमधील तीन बत्ती चौकात ट्रॅफिक पोलिसांशी झटापट आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप असलेल्या कासम खान अमीर खान पठाण आणि अशफाक रफीक सय्यद या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे.
सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांच्या न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी झाली. ३ डिसेंबर २०११ रोजी संगमनेर शहरातील तीन बत्ती चौकात ट्रॅफिक पोलीस म्हणून कर्तव्य बजावत असताना एका कार चालकाने गाडी चुकीच्या बाजूने आणल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
यावरून झालेल्या वादात आरोपींनी पोलिसाला शिवीगाळ, धमकी देऊन झटापट केल्याचा आणि शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. अजहर एस. सय्यद यांनी बाजू मांडली. बचावामध्ये मुख्यत्वे असा युक्तिवाद करण्यात आला की, घटनेच्या वेळी फिर्यादी पोलीस कर्मचारी नेमका अधिकृत ड्युटीवर असल्याबाबतची कोणतीही कागदपत्रे किंवा ड्युटी लिस्ट न्यायालयासमोर सिद्ध करण्यात आलेली नाही. तसेच फिर्यादीच्या अंगावरील फाटलेले शर्ट किंवा बटणे घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेली नाहीत आणि कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नाही.
फिर्यादीने न्यायालयात आरोपींची योग्य ओळख पटवलेली नाही आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानेही आरोपींनी झटापट केल्याचे किंवा कोणतीही शिवीगाळ व धमकी दिल्याचे साक्षीत स्पष्ट केलेले नाही, असा बचाव वकिलातर्फे मांडण्यात आला.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निकालपत्रात म्हटले की, अभियोग पक्ष आरोपींवरील आरोप संशयातीतपणे सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे न्यायालयाने आरोपी कासम खान पठाण आणि अशफाक सय्यद यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे.