महाराष्ट्र सह्याद्री न्यूज ऑनलाईन
अकोले: उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायनी म्हणून ओळखले जाणारे भंडारदरा धरण अखेर पूर्णपणे भरले आहे. आज पहाटे ३ वाजता धरणातील पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.
धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू – सकाळी ६ वाजल्यापासून धरणाच्या स्पीलवेमधून ११,४०६ क्युसेक आणि वीज निर्मितीसाठी ८५० क्युसेक, असा एकूण १२,२३१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पाण्याच्या आवकेनुसार, सकाळी ८ वाजता विसर्ग वाढवून २०,७६३ क्युसेक इतका करण्यात आला आहे. भंडारदरा धरणाची पूर्ण साठवण क्षमता १०,७६३ द.ल.घ.फू. आहे. धरण भरल्यानंतर, येणारे अतिरिक्त पाणी टप्प्याटप्प्याने सोडले जाणार असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी दिली.
निळवंडे धरणाच्या पाणी पातळीत वाढ- भंडारदरा धरणातून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे, खालील बाजूस असलेल्या निळवंडे धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. आज सकाळी निळवंडे धरणात ७,२६६ द.ल.घ.फू. पाणीसाठा होता. पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने, लवकरच निळवंडे धरणातूनही पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा- भंडारदरा आणि निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रवरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी नदीपात्रातील त्यांची चल संपत्ती, वाहने, जनावरे, शेतीची अवजारे आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात. तसेच, कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात प्रवेश करू नये. कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अखेर भंडारदरा धरण भरले; विसर्ग सुरू, निळवंडे धरणाची पाणी पातळी वाढणार
धरण भरल्यानंतर, येणारे अतिरिक्त पाणी टप्प्याटप्प्याने सोडले जाणार असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी दिली.





निळवंडे धरणाच्या पाणी पातळीत वाढ-
