महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | नाशिक
भोंदू अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणातील धक्कादायक माहिती आता एसआयटीच्या प्रमुख आयपीएस तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी दोन पोलीस उपअधीक्षक आणि तीन सहाय्यक पोलीस उप-निरीक्षकांसह एकूण चोवीस जणांचे विशेष पथक कार्यरत आहे.
एसआयटीकडे या प्रकरणातील अकरा गुन्ह्यांचा तपास सोपवण्यात आला असून, त्यामध्ये अशोक खरातवर दाखल असलेल्या नऊ गुन्ह्यांचा आणि या प्रकरणाशी संबंधित असलेल्या दोन गुन्ह्यांचा समावेश आहे. एकूण अकरा गुन्ह्यांच्या तपासामध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आठ प्रकरणांची नोंद झाली असून, उरलेली तीन प्रकरणे ही फसवणूक आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याशी संबंधित आहेत.
आरोपीच्या कृत्यांचे भयावह स्वरूप स्पष्ट करताना तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, आतापर्यंत तीसपेक्षा जास्त साक्षीदारांची चौकशी केली असता असे दिसून आले आहे की, आरोपी पीडित महिलांना दैवी शक्तीची भीती दाखवून आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूचा धाक दाखवून त्यांना धमकावत होता. खडे, रुद्राक्ष आणि चिंचुके यांचा वापर करून विविध विधींच्या नावाखाली त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले असून, पीडितांच्या बदनामीची धमकी देऊन त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्याचे काम तो करत होता.
या प्रकरणातील पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते, त्याबाबत सायबर टीमने आतापर्यंत चार हजार सहाशे पन्नास लिंक त्वरित हटवल्या आहेत. यासाठी चार जणांचे विशेष पथक अहोरात्र काम करत असून, आक्षेपार्ह मजकूर पुन्हा शेअर करणाऱ्या चारशे एकावन्न सोशल मीडिया खात्यांवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय, हे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आरोपीच्या आर्थिक व्यवहारांची आणि गैरमार्गाने कमावलेल्या संपत्तीची सखोल चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने या प्रकरणात उडी घेतली असून, एसआयटीने ईडीने मागितलेली सर्व माहिती त्यांना उपलब्ध करून दिली आहे.






