संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात
हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाचा श्वास चालू ठेवण्यासाठी छातीवर योग्य दाबाने पंपिंग (CPR) करणे अत्यंत आवश्यक असते
धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगात घाबरून न जाता, नागरिकांना त्वरित मदत मिळवून देण्यासाठी युवकांनी नेहमी तत्पर राहणे गरजेचे आहे. अपघातात किंवा आजारपणात वैद्यकीय मदत मिळेपर्यंतचा ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असतो आणि योग्य प्राथमिक उपचारामुळे एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात, असे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले.
एसएमबीटी दंत महाविद्यालय येथे संगमनेर तालुक्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या शिबिरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगात तात्काळ करावयाच्या उपचारांचे सविस्तर प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.
समाजातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी हे प्रशिक्षण अत्यंत मोलाचे ठरणार असून, तालुक्यातील युवकांनी वैद्यकीय मदतीसाठी सदैव पुढे राहावे असा संदेश या वेळी देण्यात आला. सध्याच्या युगात आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, वाढते अपघात आणि ताणतणावामुळे हृदयविकाराचा झटका, सर्पदंश, चक्कर येणे, फिट येणे, विषबाधा तसेच उष्माघात यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. अशा वेळी रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मिळणारे प्राथमिक उपचार त्याला जीवनदान देऊ शकतात. या उद्देशाने आयोजित या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थितांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
कार्यक्रम प्रसंगी डॉ. रुचिरा खानसे यांनी स्पष्ट केले की, हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाचा श्वास चालू ठेवण्यासाठी छातीवर योग्य दाबाने पंपिंग (CPR) करणे अत्यंत आवश्यक असते. तसेच फिट येणे किंवा विषबाधा झालेल्या व्यक्तीला कधीही पाणी देऊ नये, असा महत्त्वपूर्ण सल्ला त्यांनी दिला. डॉ. कल्पेश पारख यांनी सांगितले की, पॅरालिसिस किंवा अटॅकसारख्या गंभीर घटनांमध्ये प्रत्येक मिनिट मोलाचे असते. योग्य वेळी योग्य प्राथमिक उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते.
या प्रशिक्षण शिबिरास डॉ. रुचिरा खानसे, डॉ. कल्पेश पारख, डॉ. मीरा, डॉ. पद्मनाभन, अविनाश आव्हाड, सोमनाथ गुंजाळ आणि सुविधा अरासिद्ध यांच्यासह युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.