आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील गिऱ्हेवाडी जिल्हा परिषद शाळेला दिलेल्या अचानक भेटीत चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना आठ आणि नऊचे पाढे न आल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत शिक्षकांना खडे बोल सुनावले.
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील हिवरगाव पठार अंतर्गत येणाऱ्या गिऱ्हेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार समोर आला. आमदार अमोल खताळ यांनी शालेय कामकाजाची व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी करण्यासाठी या शाळेला अचानक भेट दिली. अचानक आलेल्या या भेटीमुळे शिक्षक आणि मुख्याध्यापकांची मोठी तारांबळ उडाली.
आमदारांनी थेट वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मूलभूत ज्ञानाची चाचपणी केली. यावेळी विद्यार्थ्यांना गणिताचे पाढे विचारण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली खरी, परंतु चौथी आणि पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांना आठ आणि नऊचे साधे पाढेही सांगता आले नाहीत. विद्यार्थ्यांची ही बिकट शैक्षणिक स्थिती पाहून आमदार खताळ संतप्त झाले. विद्यार्थ्यांना जर साधे पाढेच येत नसतील, तर शाळेत शिक्षक नेमके काय शिकवतात, असा थेट आणि संतप्त सवाल त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना केला.
शासन शिक्षकांना नियमित वेतन आणि मानधन देत असताना विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे, त्यांचे मूलभूत ज्ञान पक्के करणे आणि शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा घडवून आणणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. जर विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपाचे गणितच अवगत नसेल, तर अध्यापन पद्धतीत तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांना शालेय स्तरावर आवश्यक असलेले मूलभूत ज्ञान पक्के मिळावे, यासाठी शिक्षकांनी अधिक गांभीर्याने व जबाबदारीने काम करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सक्त सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
या अचानक भेटीमुळे गिऱ्हेवाडी शाळेचा अध्यापनाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.