संगमनेरमध्ये पहिल्या महिला शिवसेना शाखेचे उद्घाटन; दादागिरी व दहशतीचे दिवस संपले: आमदार अमोल खताळ
महिलांना संघटित करून त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देणे हा या शाखेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रास्ताविकात शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आणि नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी सांगितले.


हे शाखा कार्यालय शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी व या प्रभागाच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, माजी नगरसेविका अल्पना तांबे, ज्येष्ठ शिवसैनिक सुमन शेलकर, दगाबाई धात्रक, मंदा ठोंबरे, युवती प्रमुख शिवानी आरगडे, शाखाप्रमुख अंजली बेल्हेकर, उपशाखाप्रमुख स्वाती पवार, सचिव भावना गुंजाळ, कार्याध्यक्ष गीता माकरे, तसेच विनोद सूर्यवंशी, बाबा शेलकर, सागर भोईर, सनी धारणकर, समीर ओझा, सपना जाधव, संगीता पुंड आणि पुनम दायमा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय परिसरातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, बचत गटांना आर्थिक पाठबळ देणे आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. निवडणुकीतील जय-पराजयापेक्षा जनतेचा विश्वास आपल्यासाठी महत्त्वाचा असून धनशक्तीविरुद्ध जनशक्तीच्या या लढाईत जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संगमनेरमध्ये यापूर्वी विविध कामांसाठी मध्यस्थांची गरज लागत होती, परंतु आता संपर्क कार्यालयाद्वारे रेशनकार्ड, आधारकार्ड दुरुस्ती व अन्नधान्याचे प्रश्न थेट सुटत आहेत. साईनगर परिसरात दिवाळीनंतर विशेष शिबिर आयोजित केले जाणार असून, त्यात संजय गांधी निराधार योजना, रेशनकार्ड आणि आधारकार्ड दुरुस्तीसह इतर शासकीय कामांचा निपटारा केला जाईल, अशी माहिती आमदार खताळ यांनी दिली.
