सोमवारी (५ ऑक्टोबर) दिल्ली नाका परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने गतिरोधक बसविण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही उपाययोजना स्वागतार्ह आहे. मात्र, केवळ गतिरोधक बसविल्याने दिल्ली नाका परिसरातील अपघातांची समस्या कायमस्वरूपी सुटणार नाही, अशी भूमिका भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा सचिव इरफानभाई मन्सुरी यांनी व्यक्त केली.
दिल्ली नाका परिसरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक, रस्त्यावरील अतिक्रमणे, अरुंद झालेले रस्ते, बेशिस्त पार्किंग आणि वाहतुकीचे नियोजन या बाबींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अवजड वाहने शहरातील गर्दीच्या भागातून जात असतील तर त्यासाठी पर्यायी मार्ग किंवा वेळेचे नियोजन करण्याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा.
“गतिरोधक हा वाहनांचा वेग कमी करण्यासाठीचा एक उपाय आहे; मात्र तो अपघात रोखण्याचा एकमेव उपाय नाही. रस्ते अतिक्रमणमुक्त आणि वाहतुकीसाठी पूर्णपणे खुले झाले, अवजड वाहनांचे योग्य नियोजन झाले आणि वाहतूक शिस्तीची प्रभावी अंमलबजावणी झाली तरच नागरिकांना सुरक्षित रस्ते मिळतील,” असे त्यांनी सांगितले.
दिल्ली नाका परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न यापूर्वीही चर्चेत आला असून अतिक्रमण हटविल्यानंतर रस्ता अधिक मोकळा झाल्याचे म्हटले असले तरी त्यामुळे केवळ कारवाई करून थांबण्याऐवजी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे आवश्यक आहे.
यासोबतच परिसरात स्पष्ट वाहतूक चिन्हे, रस्त्यावरील प्रकाशव्यवस्था, योग्य पार्किंग व्यवस्था, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित जागा आणि वाहतूक पोलिसांचे प्रभावी नियोजन करण्यात यावे. अपघातप्रवण ठिकाणांचा अभ्यास करून आवश्यक त्या ठिकाणी वैज्ञानिक पद्धतीने गतिरोधक अथवा इतर सुरक्षितता उपाययोजना कराव्यात.
“नागरिकांच्या जीविताशी संबंधित प्रश्नात तात्पुरत्या उपायांपेक्षा कायमस्वरूपी वाहतूक नियोजनाला प्राधान्य मिळाले पाहिजे. प्रशासनाने सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन दिल्ली नाका परिसरासाठी ठोस वाहतूक सुरक्षा आराखडा तयार करावा,” अशी मागणी मन्सुरी यांनी केली.