महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
राहुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात (गु.र.नं. १२०२/२०२६) संघटित गुन्हेगारी टोळीवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १११ अन्वये वाढीव कलम लावण्याची कारवाई अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केली आहे. या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली असून, टोळीप्रमुखासह पाच जण अद्याप फरार आहेत.
२७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फिर्यादी विनीत विक्रांत शिर्के (उपविभागीय अधिकारी, राहुरी) हे आपल्या शासकीय वाहनातून चालकासोबत मालुंजा येथील शासकीय लिलाव झालेल्या वाळू गटाची पाहणी करून लाख, जातप, बेलापूर मार्गे चिंचोली गावाकडे जात होते. गंगापूर गावच्या शिवारात रस्त्यावर त्यांना विना क्रमांकाचा हायवा डंपर आढळून आला. त्यांनी डंपर थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये अंदाजे ६ ब्रास मुरूम दिसून आला. डंपरचालकाने आपले नाव धनराज चौधरी आणि डंपर मालकाचे नाव दीपक ऊर्फ प्रवीण बबन लाटे (रा. चिंचोली, ता. राहुरी) असल्याचे सांगितले.
त्याच्याकडे रॉयल्टी व कागदपत्रांबाबत विचारणा केली असता कोणतीही कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले. बेकायदेशीर मुरूम वाहतूक करत असल्याने कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालय राहुरी येथे डंपर घेऊन जायचे आहे, असे सांगून फिर्यादी डंपरमध्ये बसले आणि चालकाने डंपर पिंपळगाव फुणगी मार्गे राहुरीकडे नेण्यास सुरुवात केली. पाठीमागे फिर्यादींचे शासकीय वाहन चालक घेऊन निघाला. पिंपळगाव फुणगी येथे रस्त्यावर आरोपींनी मोटारसायकल डंपरसमोर आडवी लावून डंपर थांबवला. त्यानंतर आरोपीने डंपरमध्ये बसलेल्या बाजूच्या दरवाजाजवळ येऊन दरवाजा उघडला आणि फिर्यादींना खाली खेचून डंपरच्या समोरील चाकाखाली ओढून टाकत डंपर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र, फिर्यादींनी प्रसंगावधान राखून रस्त्याच्या कडेला उडी मारून आपला जीव वाचवला. त्यावेळी फिर्यादींचे चालक आणि मोटारसायकलवर आलेले अनोळखी इसम यांनी तिथून डंपर पळवून नेले. फिर्यादी व त्यांच्या शासकीय वाहनावरील चालकाने पाठलाग केला; परंतु चालकाने डंपरमधील मुरूम संक्रापूर ते लांडेवाडी वस्ती रस्त्यावर टाकून अडथळा निर्माण करत डंपर पळवून नेले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात आरोपी म्हणून दीपक ऊर्फ प्रवीण बबन लाटे (वय ३८ वर्षे, रा. चिंचोली, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर – टोळी प्रमुख), धनराज बबन चौधरी, सतिश रावसाहेब कुदनर (वय ३२ वर्षे, रा. पिंपळगाव फुणगी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर), तुषार चंद्रकांत जाधव (वय २६ वर्षे, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर), शरद बाळासाहेब भोसले (वय ३६ वर्षे, रा. चिंचोली, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर), दत्ता माळी, अक्षय पवार आणि अर्जुन निकम यांची नावे निष्पन्न झाली आहेत. यापैकी आरोपी क्रमांक २ ते ४ यांना अटक करण्यात आली असून, आरोपी क्रमांक १, ५, ६, ७ व ८ हे अद्याप फरार आहेत.
या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १११ हे वाढीव कलम समाविष्ट करण्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांच्याकडून अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी प्रस्तावाचे अवलोकन केले असता, आरोपी दीपक ऊर्फ प्रवीण बबन लाटे व त्याच्या साथीदारांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी बनवून गुन्हेगारी कृत्ये केल्याचे स्पष्ट झाले. या टोळीवर यापूर्वी एकत्रितपणे दोन किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल असून, संघटित टोळीप्रमुख व साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, अवैध गौण खनिज चोरी करणे, स्त्रीचा विनयभंग करणे, पळवून नेऊन जबरी चोरी करणे, जबरीने मालमत्ता हिसकावणे, शासकीय कामात अडथळा करणे, फौजदारीपात्र गृह अतिक्रमण करून दुखापत करणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे, आगळीक करणे आदी गंभीर स्वरूपाचे एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. मोक्का कायद्याप्रमाणे संघटित गुन्हेगारीसाठी असलेल्या शिक्षेची तरतूद बीएनएस कलम १११ मध्ये असून, पोलीस अधीक्षक किंवा अपर पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी हे कलम लावण्याची परवानगी देतात.






