महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून धडक कारवाई केली. आज शनिवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल साडेसहा लाख रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू व पानमसाला जप्त केला असून वाहनासह एकूण ११ लाख ८६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाजगी वाहनाने अवैध धंद्यांची माहिती काढण्यासाठी गस्त घालत होते. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब नागरगोजे यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, संजय माधव भागवत हा गुंजाळवाडी रोडवरील अरगडे मळा परिसरात मारुती सुझुकी ओमिनी गाडी (क्रमांक MH 17 BV 9057) मधून बेकायदेशीर सुगंधी तंबाखू व पानमसाल्याची विक्री व वाहतूक करत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ अरगडे मळा परिसरात सापळा रचला.
सकाळी पावणेदहाच्या सुमारास संशयित ओमिनी गाडी आणि तिच्या मागे होंडा ॲक्टिव्हा (क्रमांक MH 17 DE 1358) येत असताना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुचाकीस्वार पोलीस चाहुल लागताच पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी ओमिनी चालकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव संजय माधव भागवत (रा. इंदिरानगर, गल्ली क्र. ५, संगमनेर) असे सांगितले.
गाडीची झडती घेतली असता त्यात ४ लाख ५३ हजार ६०० रुपये किमतीचा विमल बिग पॅक पानमसाला, १ लाख ८९ हजार ९०० रुपयांची व्ही-१ तंबाखू, १ लाख ३० हजार ६८० रुपयांचा विमल स्मॉल पॅक पानमसाला, १४ हजार ५२० रुपयांची व्ही-१ तंबाखू, ५२ हजार रुपयांचा रजनीगंधा पानमसाला आणि ६ हजार ७५० रुपयांची तुळशी तंबाखू असा साडेसहा लाखांचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी गुटख्यासह ५ लाख रुपयांची ओमिनी गाडी आणि १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ११,८६,४५० रुपयांचा ऐवज जप्त केला.
सदरचा गुटखा नाशिक येथील रफिक सय्यद व समीर इनामदार यांच्याकडून आणल्याचे आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ पाखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संजय माधव भागवत, विजय चंद्रकांत भागवत (दोघे रा. इंदिरानगर, संगमनेर) आणि रफिक सय्यद व समीर इनामदार (दोघे रा. नाशिक, फरार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.