महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील सतीश आप्पासाहेब वाणी (वय ३५) या तरुणाने शनिवारी (दि. १७) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चणेगाव येथील वसंत बंधाऱ्यावरून पाण्यात उडी मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेनंतरोही तरुणाचा पत्ता लागलेला नसून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी चणेगाव बंधाऱ्यावरून प्रवास करणाऱ्या काही ग्रामस्थांना एका व्यक्तीने पाण्यात उडी मारल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असता, तिथे एक दुचाकी आणि जवळच एक मोबाईल फोन पडून असल्याचे निदर्शनास आले. त्या गाडी आणि मोबाईलच्या आधारे सदर व्यक्ती सतीश आप्पासाहेब वाणी असल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ वाणी कुटुंबियांना व संबंधित पोलीस ठाण्यांना कळवले. तसेच जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ रेस्क्यू टीम, पाटबंधारे विभाग व पोलीस प्रशासनाला युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्याचे आदेश दिले.
शनिवारी रात्री अंधार पडल्यामुळे शोधकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी साडेअकरा वाजता आश्वी पोलीस, पाटबंधारे विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि राहाता रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनीही महसूल विभागाला तातडीने मदतीचे आदेश दिले असून, ग्राम महसूल अधिकारी अनुपमा गांगुर्डे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्यात सहभाग घेतला. पाण्याचा प्रवाह व खोली जास्त असल्याने शोध घेण्यात अडचणी येत असल्या तरी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.