महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्त्री शक्तीचा जागर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या काळात महिला आणि मुलींच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी श्रीरामपूर पोलीस विभागाने एक अनोखा व कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे. गेल्या दोन वर्षांत छेडछाड, विनयभंग आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तक्रार नोंदवणाऱ्या तब्बल एक हजार महिलांशी पोलिसांनी थेट फोनवरून संपर्क साधून त्यांची विचारपूस केली आहे. या थेट संवादामुळे ९३ टक्क्यांहून अधिक महिला तक्रारदारांनी पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले. तर महिलांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
श्रीरामपूर पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या संगमनेर शहर, संगमनेर तालुका, अकोले, राजुर, घारगाव, आश्वी, कोपरगाव शहर, कोपरगाव तालुका, शिर्डी, लोणी, राहता, श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका, राहुरी, नेवासा, सोनई व शनिशिंगणापूर या १७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांत दाखल झालेल्या गुन्ह्यांची संपूर्ण माहिती एकत्र करण्यात आली होती. यामध्ये बलात्काराचे २५१ आणि विनयभंगाचे ६६६ असे एकूण ९१७ गुन्हे नोंदवले गेले होते.
या सर्व गुन्ह्यांमधील पीडित महिलांना खरोखरच योग्य न्याय मिळाला का आणि आरोपींकडून त्यांना पुन्हा काही त्रास होतोय का, याची शहानिशा करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात सात महिला पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. महिला पोलीस उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील या पथकाने नवरात्रौत्सव सुरू झाल्यापासून गेल्या तीन दिवसांत सुमारे एक हजार महिला तक्रारदारांशी फोनवरून थेट संवाद साधला.
या विशेष मोहिमेदरम्यान तब्बल ८४६ महिलांनी पोलिसांनी केलेल्या वेळेवरच्या व योग्य कारवाईमुळे आरोपींचा त्रास पूर्णपणे थांबल्याचे सांगत पोलिसांचे आभार मानले व समाधान व्यक्त केले. मात्र, दुसरीकडे ७१ महिलांनी अजूनही संबंधित आरोपींकडून त्रास होत असल्याचे किंवा छुप्या पद्धतीने पाठलाग व गैरप्रकार सुरू असल्याचे पोलिसांना सांगितले.
ज्या ७१ महिलांनी अद्यापही त्रास होत असल्याचे नमूद केले आहे, त्यांच्या तक्रारीची पोलिसांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. अशा आरोपींवर येत्या १० दिवसांत अत्यंत कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल आणि गरज पडल्यास त्यांच्यावर नव्याने गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे, महिला पोलीस उपनिरीक्षक बेबी शिंदे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता उंदरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पुनम मन्तोडे, रुपाली लोहाळे, शिवानी देशमुख, निशिगंधा कोळसे, वैष्णवी दहिटनेकर, तेजल अभंग आणि अर्चना अहिरे या महिला पोलीस पथकाने हा यशस्वी व धडक उपक्रम राबवला आहे. पोलिसांच्या या आत्मपरीक्षण करणाऱ्या आणि थेट संवादाच्या भूमिकेचे नागरिकांमधून मोठे कौतुक होत आहे.