महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
सर्वत्र दीपावली पाडव्याच्या सण उत्साहात साजरा होत असताना संगमनेर तालुक्यातील साकुरमधून दुःखद घटना समोर आली आहे. सातपूर नजीक पिंपळगाव देपा गावात झालेल्या दुचाकी आणि छोटा हत्ती टेम्पोच्या अपघातात मोटरसायकलवरील दोघा तरुणांचा मृत्यू झाला.
ओम राहूल पेंडभाजे (वय १९ वर्ष) व शुभम सदाशिव टेकुडे (वय १८ वर्ष, दोघे रा. देवगिरी वस्ती, साकूर, ता. संगमनेर) अशी अपघातात ठार झालेल्या दोघा तरूणांची नावे आहेत.
घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास साकुरहून मोटार सायकलवर हे दोघे तरुण संगमनेरच्या दिशेने येत असताना संगमनेरकडून साकुरच्या दिशेने जाणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोने या तरुणांच्या दुचाकीला पिंपळगाव देपा गावाच्या शिवारात जोराची धडक दिली.
अपघातानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी अपघातातील जखमी तरुणांना रुग्णालयात हलविण्यास मदत केली. जखमींना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथे आणण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
अपघाताची माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते, प्रमोद चव्हाण, हरिश्चंद्र बांडे, संतोष फड यांनी घटनास्थळी धाव घेतली. ऐन दीपावली पाडव्याच्याच दिवशी या दोघा तरूणांच्या अपघाती मृत्यूने पठारभागावर शोककळा पसरली आहे.
दीपावली पाडव्याच्या आनंदावर विरजण अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू
पिंपळगाव देपा शिवारात टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी स्वारांच्या मृत्यूने साकुर परिसरात शोककळा

