नाशिक-पुणे बायपासवरील घुलेवाडी हद्दीत रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बुलेट आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात बुलेटस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलेटस्वार आपल्या ताब्यातील बुलेट नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. घुलेवाडी हद्दीत बुलेट पुढे चाललेल्या कंटेनरला बुलेटने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कंटेनरचा टायर फुटला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अपघातात बुलेटस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने स्थानिकांनी त्याला तात्काळ घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शेखावत गजेंद्र सिंग रा (रा. राजस्थान) असे मृत तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघाताचा हा भीषण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, अपघात नेमका कशामुळे झाला या संदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत.