महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
दुचाकी, महिलांच्या दागिन्यासह पोलिसांच्या दृष्टीने किरकोळ असणाऱ्या चोऱ्यांच्या घटना नियमित घडत असताना आता चोरट्यांनी आपला मोर्चा चंदनाच्या झाडाकडे वळविला आहे. अज्ञात चोरट्याने चंदनाचे झाडच चोरून नेल्याचा प्रकार पोलीस दप्तरी दाखल झाला आहे.
चंदनाच्या झाडाची चोरी करणारा चोरटा आणि झाड दोघांचाही शहर पोलिसांना तपास लागू शकलेला नाही. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मालपाणी उद्योग समूहातील सुरक्षा रक्षक भारत मुरलीधर मोरे यांनी तक्रार दाखल केली आहे. २१ नोव्हेंबरला पहाटे दोन ते साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
मालपाणी हेल्थ क्लब येथून सुमारे पाच हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या या झाडाची अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. या संदर्भात बुधवारी दुपारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चंदनाचे झाड आणि आरोपीचा शोध घेत आहेत. शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल धनवट यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला असल्याची माहिती मिळाली.

