महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर मधील ज्येष्ठ रंगकर्मी, निर्माते वसंत बंदावणे यांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आले आहे.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, सांस्कृतिक विभागाच्या राज्याध्यक्ष विद्या कदम, सरचिटणीस सम्राट साळवी, समन्वयक अमोल थोरात यांनी बंदावणे यांची सांस्कृतिक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बंदावणे यांना निवडीचे पत्र दिले.
बंदावणे पंचेचाळीस वर्षांपासून संगमनेर व नगरच्या सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. लीनीयर फिल्म्स या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बंदीशाळा व अनेक मालिका, लघु चित्रपटांची निर्मिती केली आहे. संग्राम संस्थेच्या अनेक नाटकांत भूमिका, नेपथ्य, प्रकाश योजना अशा जबाबदाऱ्या पार पाडून राज्य नाट्य स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली आहेत. 
त्यांच्या लघुपटांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले आहेत. ते बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. या निवडीबद्दल बाळासाहेब थोरात यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ नाटककार डॉ. सोमनाथ मुटकुळे, अभिनेते सूर्यकांत शिंदे, काँग्रेस कार्यकर्ते डॉ. नामदेव गुंजाळ, रंगकर्मी अंतून घोडके, ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानदेव वाफारे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, सरपंच योगेश पवार, राज्य कार्यकारिणी सदस्य शाहीर रेवणनाथ देशमुख उपस्थित होते. बंदावणे यांचे आमदार डॉ. सुधीर तांबे, काँगेस जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांच्यासह विविध घटकातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
कलावंतांच्या अनेक समस्या आहेत. लवकरच तालुकाध्यक्षांची निवड करून काँग्रेसच्या माध्यमातून कलावंतांच्या समस्या सोडवून सर्व कलाप्रकारांच्या कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल.
वसंत बंदावणे, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष

