महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
सातारा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत संगमनेरच्या गीता परिवाराच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर सुवर्ण यश मिळवले आहे. संगमनेर आणि पुणे-हडपसर येथील गीता परिवाराच्या दैनिक कराटे वर्गातील खेळाडूंनी या स्पर्धेत सर्वच प्रकारांत वर्चस्व गाजवत तब्बल १२६ पदकांची भरघोस कमाई केली आणि उपविजेतेपदाचा बहुमान पटकावला.
या राज्यस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, मुंबई, नवी मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, पनवेल आणि तळेगाव दाभाडे अशा महाराष्ट्रातील विविध भागांतून ७०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.
स्पर्धेत कुमिते (प्रत्यक्ष लढत), काता आणि ग्रुप काता अशा तीन मुख्य प्रकारांत चुरस पाहायला मिळाली. गीता परिवारातील केवळ ६४ खेळाडूंनी या तिन्ही प्रकारांत आपल्या शिस्तबद्ध आणि अचूक सादरीकरणाच्या जोरावर ४० सुवर्ण, ३४ रजत आणि ५२ कांस्य पदके मिळवून एकूण १२६ पदकांचा विक्रम रचला.
तांत्रिक अचूकता आणि सादरीकरणासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘काता’ प्रकारात प्रथमेश त्र्यंबके, मृणाली बागले व शिवेंद्र देशमुख यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. आयुष काचोळे, शिवप्रसाद दिवे, सिद्धेश्वरी आहेर, आदित्य शिंदे, देवांश परदेशी, साईश गवंडी आणि साईराज कडलग यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत रजतपदक मिळवले. तर ईश्वरी ढोले, भक्ती ढोले, हर्षल शेलकर, साई औताडे, आनंदी कर्पे, तनुजा जोर्वेकर, आर्या बंगाळ आणि दिव्यांका गलांडे यांनी कांस्यपदक प्राप्त केले.
प्रत्यक्ष प्रतिस्पर्ध्याविरुद्धच्या ‘कुमिते’ प्रकारात गीता परिवाराच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवला. प्रथमेश त्र्यंबके, आयुष काचोळे, शिवप्रसाद दिवे, प्रिया मंडलिक, सिद्धेश्वरी आहेर, रुद्रा मंतोडे, हर्षल शेलकर, रणबीर गलांडे, देवांश परदेशी, साईश गवंडी, आर्या बंगाळ आणि दिव्यांका गलांडे या सर्व खेळाडूंनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदक पटकावले.
याच प्रकारात समर्थ जोशी व शिवेंद्र देशमुख यांनी रजतपदक मिळवले, तर इतर खेळाडूंनी कांस्यपदकांची कमाई केली. याशिवाय संघिक कौशल्य दाखवणाऱ्या ‘ग्रुप काता’ प्रकारात सिया मंडलिक, ईश्वरी ढोले आणि भक्ती ढोले यांच्या संघाने रजतपदक मिळवून पदक तालिकेत महत्त्वाची भर घातली.
सिकंदराबाद येथील इंडिया ओकिनावा स्टाईलचे चीफ मास्टर एस. श्रीनिवासन यांनी या स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून काम पाहिले. रमेश व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धेचे नियोजनबद्ध संयोजन केले होते.
या विजेत्या खेळाडूंना दत्ता भांदुर्गे, प्रमोद मेहेत्रे, राजेश राहणे, विकास गुंजाळ, आशुतोष गायकवाड, ऋषिकेश कडूस्कर, ओम जोर्वेकर आणि प्रज्ज्वल कानवडे यांचे मार्गदर्शन लाभले. गीता परिवाराच्या कराटे वर्गाने राज्य पातळीवर मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply