महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने अहमदाबाद येथील वीर सावरकर क्रीडा संकुलात आयोजित ‘ब्रिक्स पारंपरिक व स्वदेशी खेळांच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात’ संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी भारतीय योगपरंपरेचे अप्रतिम दर्शन घडवत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला.
भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात योगासन प्रात्यक्षिकांसाठी महाराष्ट्राच्या १५ खेळाडूंच्या पथकाची निवड करण्यात आली होती. यामध्ये संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमधील आर्यन खरात, प्रणव साहू, अंश मयेकर, रोहन तायडे, तृप्ती डोंगरे, रुद्रांक्षी भावे, प्रांजल व्हन्ना व देवांशी वाकळे या आठ विद्यार्थ्यांसह पुण्यातील ध्रुवची विद्यार्थिनी नीरल वाडेकर आणि माजी विद्यार्थिनी तन्वी रेडीज अशा एकूण १० जणांचा समावेश होता.
पारंपरिक खेळांचे जतन, सांस्कृतिक संवर्धन आणि आंतरराष्ट्रीय मैत्री वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित या महोत्सवात ‘ब्रिक्स’च्या १० सदस्य देशांतील जवळपास १६० खेळाडू व प्रतिनिधी सहभागी झाले होते. या सोहळ्यात भारताकडून योगासन, मल्लखांब आणि कलरीपयट्टू या प्राचीन परंपरांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. ध्रुवच्या योगासनपटूंनी लयबद्ध आणि कलात्मक सादरीकरणातून शरीर, मन व श्वास यांच्या समन्वयाची भारतीय ज्ञानपरंपरा अधोरेखित करत उपस्थितांची दाद मिळवली. या पथकाला प्रशिक्षक चंचल माळी आणि व्यवस्थापक उमेश झोटिंग यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हाईस चेअरमन गिरीश मालपाणी आणि प्राचार्या संध्या धुळगंडे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
“योग ही भारताची प्राचीन ज्ञानपरंपरा असून, तिचे जागतिक स्तरावर क्रीडारुपाने संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. योगासनांच्या प्रसारासाठी संस्थात्मक कार्य, संशोधन आणि गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण यांची सांगड घालण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ब्रिक्सच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय योगपरंपरेचे प्रतिनिधित्व करणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना योग्य दिशा आणि संधी दिल्यास ते जागतिक स्तरावरही आपली गुणवत्ता सिद्ध करु शकतात, याचा हा प्रत्यय आहे.” — डॉ. संजय मालपाणी (चेअरमन, ध्रुव ग्लोबल स्कूल)