महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी गावांमध्ये बायपासच्या वरती काही डेव्हलपर ग्रुपकडून सुरू असलेल्या जमिनींचे व्यवहार, अनधिकृत लेआऊट आणि नियमबाह्य भूखंड विक्रीच्या प्रकारांना ऊत आला आहे. काही एजंटांच्या माध्यमातून शासनाचे नियम आणि अटी धाब्यावर बसवून सुरू असलेल्या आर्थिक उलाढालीमुळे ग्रामपातळीवर चर्चा सुरू झाली आहे. या गैरप्रकारांमध्ये प्रशासनातील काही संबंधित व्यक्तींना हाताशी धरून नियमबाह्य कामांना संरक्षण दिले जात असल्याचा ठपका ग्रामसभेत ठेवण्यात आल्याने तालुक्यातील जमीन व्यवहारांचे वास्तव पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे.
गावाच्या विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी, शेतकऱ्यांच्या मालमत्ता आणि भविष्यातील गुंतवणुकीशी संबंधित व्यवहार होताना शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे का, तसेच भूखंड खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांची फसवणूक झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल सुशिक्षित नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गुंजाळवाडी येथील ग्रामसभेत प्रत्येक लेआऊटमध्ये दोन पाण्याचे बोर आणि एक लाइट डीपी असा शेतकरी हिताचा प्रस्ताव मांडण्यात आला. काही शेतकरी, अभियंते, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य वर्ग बोर बंदीच्या बाजूने भूमिका मांडत असताना, काही एजंटांनी आधीचे सगळे बोर बंद करा, गावात कोणी जमिनी विकू नका असा ठराव घ्या आणि गुंठेधारकांची ग्रामपंचायत पाण्याची जबाबदारी घेणार आहे का, असे वादग्रस्त मुद्दे उपस्थित करून प्रस्तावाला आडकाठी आणली. त्यांच्या समर्थकांनी गोंधळ निर्माण केल्याचा आरोप आहे. गावातील शेतकऱ्यांपेक्षा अद्याप राहायला न आलेल्या खरेदीदारांची बाजू एजंटांकडून मांडली जात होती. विशेष म्हणजे, बोरसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे ग्रामसभेपूर्वीच गावच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जाहीर झाल्याने सामान्य शेतकऱ्यांवर दहशत आणि दबाव तंत्राचा वापर झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते निलेश गुंजाळ यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
ग्रामसभेतील लोकशाही व्यासपीठाचा वापर करत सामाजिक कार्यकर्ते निलेश गुंजाळ यांनी गावातील अनधिकृत लेआऊट, नियमबाह्य भूखंड विक्री आणि एजंटांच्या संशयास्पद हालचालींचा पाढा मांडला. संबंधित लेआऊटबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासनाकडे पारदर्शकतेची मागणी केली. ग्रामपंचायतीकडील गोपनीय कागदपत्रे व्हॉट्सॲपवर जाहीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा गोपनीय अहवाल तलाठ्यांमार्फत तहसीलदारांकडे सादर करण्याची मागणीही त्यांनी ग्रामसभेत केली. मात्र, गावातील गैरप्रकारांवर प्रश्न विचारणे काहींच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत असून, प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी निलेश गुंजाळ यांच्यावरच दबाव आणण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे. एजंटांकडून वैयक्तिक त्रास आणि धमक्या दिल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अनधिकृत प्लॉटिंगचा मुद्दा केवळ जमिनीचे तुकडे पाडून विकण्यापुरता मर्यादित नसून, त्यामध्ये भविष्यातील नागरी व मूलभूत सुविधांचे नियोजन झाले आहे की नाही, हा कळीचा मुद्दा ठरत आहे. संबंधित प्लॉटिंगमध्ये ॲम्ब्युलन्स आणि अग्निशमन दलाच्या वाहनांसाठी पुरेशी जागा, पाणीपुरवठ्याची व्यवस्था, कम्युनिटी स्पेस, युटिलिटी स्पेस, ओपन स्पेस तसेच भूमिगत वीजवाहिन्या आणि गॅस कनेक्शन यांसारख्या सुविधांसाठी तरतुदी केल्या आहेत का, याबाबत स्पष्टता नसल्याने ग्रामसभेत प्रश्न उपस्थित झाले. भविष्यात आगीची किंवा वैद्यकीय आपत्कालीन घटना घडल्यास बचाव वाहने सहज पोहोचू शकतील का, तसेच मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्लॉट विकून नफा कमावणारे एजंट घेणार की पुन्हा ग्रामपंचायत व शासनाच्या तिजोरीवर भार पडणार, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. मंजूर लेआऊट, ना-हरकत प्रमाणपत्रे, आरक्षित जागा आणि प्रत्यक्ष उपलब्ध पायाभूत सुविधांची अधिकृत तपासणी होण्याची मागणी होत आहे. ग्रामपंचायतीची डोळेझाक करण्याची भूमिका पुढील पिढीसाठी मारक ठरू शकेल, अशी हळहळही ग्रामसभेत व्यक्त करण्यात आली.
अनधिकृत प्लॉटिंग आणि एजंटांच्या व्यवहारांविरोधात आवाज उठवणाऱ्या निलेश गुंजाळ यांना धमकावण्याचे प्रकार घडल्याचा आरोप असून, त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी खोट्या खंडणीचे आरोप करण्यात आल्याचीही चर्चा आहे. मात्र, या सर्व दबावतंत्राला न जुमानता निलेश गुंजाळ यांनी आपला संघर्ष कायम ठेवला आहे. सामान्य नागरिकांच्या हितासाठी प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का आणि नियमांची अंमलबजावणी मागणे म्हणजे त्रास देणे ठरते का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
या संपूर्ण प्रकरणात काही एजंटांनी लोकप्रतिनिधींच्या भोवती तयार केलेले कथित आभासी चित्रही चर्चेचा विषय ठरले आहे. गावात सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे चित्र मध्यस्थांकडून रंगवले जात असले, तरी प्रत्यक्ष वास्तव आणि सर्वसामान्य ग्रामस्थांच्या समस्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचतात का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. प्रामाणिकपणे गावाच्या हितासाठी लढा देणाऱ्या निलेश गुंजाळ यांना त्रास सहन करावा लागत असताना, या आभासी जगाची सत्यता तपासणे गरजेचे मानले जात आहे.
संबंधित गावांतील प्लॉटिंग व्यवहारांची कागदपत्रे, आवश्यक परवानग्या, जमीन वापर बदल, मंजूर नकाशे, नोंदणी व्यवहार, आपत्कालीन मार्ग व पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी जोर धरत आहे. दोषींवर कोणताही राजकीय किंवा प्रशासकीय दबाव न घेता कारवाई करावी, तसेच आवाज उठवणाऱ्या निलेश गुंजाळ यांना संरक्षण देऊन त्यांच्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






