देशाच्या राजकारणात सर्वाधिक काळ घालवलेले ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाच्या तर्हेवाईक वागण्याचे परिणाम आता देशाला सोसावे लागणार असं दिसतं. दिवंगत ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण असो की भाजपचा अजेंडा असलेल्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा विषय असो, पवारांच्या पक्षाच्या तकलादू भूमिकेने सारा महाराष्ट्र ढवळून निघाला आहेच, शिवाय देशातही याचे पडसाद उमटू लागले आहेत.
पवारांना अजून काय हवंय, काय अपेक्षा आहेत त्यांच्या, असे असंख्य सवाल देशभरातील जनता त्यांच्या पक्षाला, स्वतः पवार यांना आणि त्यांच्या कन्यका सुप्रिया सुळेंना विचारत आहे. आपण आणि आपला पक्ष प्रसंगी कितीही वाकू शकतो, याचं प्रत्यंतर म्हणजे वरील दोन मुद्द्यांवर त्या पक्षाने घेतलेल्या भूमिका होत. इंडिया आघाडीच्या सर्वोच्च नेत्यांच्या गटात मोडणार्या पवारकन्या सुप्रिया सुळे या असं काही करू देणार नाहीत, या विश्वासाला त्यांनीच तडा लावायचं ठरवलेलं दिसतं.
आजारपणात उपचार घेत असलेल्या पवारांच्या नंतर पक्षाच्या वतीने निर्णय घेण्याचे अधिकार हे सुप्रिया सुळे यांनाच आहेत. पक्षाच्या पदाधिकार्यांना निर्णय घेण्याचे अधिकार असते तर अजित पवार यांना मृत्यूपश्चात न्याय मिळवू पाहणार्या रोहित पवार यांना एकाकी पाडण्याचं पाप पक्षाने केलं नसतं. यामुळेच विश्वासार्हतेच्या मुद्द्यावर हा पक्ष आणि त्यांच्या नेत्यांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलू लागला आहे.
अजित पवार यांचा मृत्यू कसा झाला, हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सांगायची आवश्यकता नाही. अशावेळी किमान वास्तव जनतेपुढे येणं, हे अगत्याचं असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ज्या प्रकारे हे प्रकरण दुर्लक्षिलं ते पाहता सत्तेपुढे लाचार न होण्याचं हा पक्ष नाटक करत होता, हे उघड आहे. ज्या पक्षावर आणि पक्षाच्या नेत्यांवर रोहित पवार यांनी थेट बोट दाखवलं त्यानंतर तरी पक्षाने भूमिका घेण्याची आवश्यकता होती. ते त्यांनी केलं नाहीच, उलट केलेल्या आरोपावरून संबंधितांना क्लीनचिट देऊन सावरण्याचं पाप केलं आहे.
अजित पवारांच्या स्मृतींना ठोकरून सुप्रिया सुळे यांनी भावाच्या प्रेमालाही वाटेला लावलं. रोहित पवार यांचे प्रश्न सर्वसामान्यांना पडलेल्या संशयाला जागा निर्माण करणारे असताना सुप्रिया सुळेंना ते तकलादू वाटतात, यावरून त्यांच्या आणि भाजप नेत्यांच्या राजकीय साटमारीचा संशय गडद होणं स्वाभाविक आहे. अजित पवारांना त्यांच्या राष्ट्रवादीने आणि त्या पक्षाच्या नेत्यांनी दुर्लक्षित केल्याचं दिसत असताना सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पक्षाने पवारांना न्यायाने जगवलं असतं तर सुळे आणि त्यांचा पक्ष मोठा झाला असता. पण अशा संधी घेण्यासाठी प्रामाणिकपणा जपावा लागतो. तो आज पवारांच्या राष्ट्रवादीकडे राहिलेला नाही.
दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मागण्यांसाठी रोहित पवार यांनी ट्रॅक्टर मोर्चा जाहीर केल्यावर मोर्चाला पाठिंबा देण्याऐवजी मोर्चापासून दूर राहण्याचा संदेश देत आपण सत्तेचे लालसी आहोत हे सुळे यांनी दाखवून दिलं आहे. शेतकर्यांच्या नावाने राजकारण करायचं आणि त्यांना न्याय देण्याची वेळ आली की पळून जायचं, हे सुप्रिया सुळे यांना या वयात शोभणारं नाही. पवारांचं वय झालंय. राजकीय ताकदीच्या जोरावर त्यांनी अशा अनेक गोष्टी केल्या आणि त्या पचवल्याही. कितीही आव आणला तरी सुप्रिया या नवख्या आहेत. युवक म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे, शिवाय पवारांनाही त्या पटवू शकतात, इतकी जाण असल्यानेच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी त्यांना महत्त्व दिलं. राजकारणाच्या अनेक पायर्या त्यांना चढायच्या आहेत. उभरत्या काळात असे खेळ खेळून स्वतःच्या पायावर दगड घालण्यासारखं आहे. हे सुप्रिया सुळेंना कळत नसेल?
एकीकडे अजित पवारांना न्याय देण्यात हयगय करणार्या सुप्रिया सुळे यांनी इंडिया आघाडीचा केलेला धोबीपछाड हाही दुर्लक्षित करण्यासारखा नाही. इंडिया आघाडीच्या पहिल्या फळीतील नेत्या म्हणून ज्यांच्याकडे अपेक्षेने पाहिलं जात होतं, त्या सुप्रिया सुळे या आघाडीला इतक्या सहज दूर लोटतील, याचा साधारण अंदाजही वाटत नव्हता. मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या निमित्ताने त्यांनी घेतलेली भूमिका आघाडीचा घात करणारीच आहे.
मतदारसंघांची पुनर्रचना हा विषय भाजपला अनंतकाळ सत्तेच्या स्वप्नांची फलश्रुती आहे, हे एव्हाना देश जाणून असताना तो सुप्रिया यांना कळत नाही, असं कसं म्हणता येईल? मसुदा पाहण्याचं निमित्त करत त्या आघाडीत बिघाडी करत आहेत. महिला आरक्षणाच्या निमित्ताने मतदारसंघांची पुनर्रचना करायची आणि लोकसभेच्या जागा ८१४ पर्यंत वाढवायचं डोकं ज्या कोणी लढवलंय त्यांच्या हेतूला ठोकरून लावण्याऐवजी त्यालाच खरं ठरवण्यामागची गणितं सोपी आहेत. हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी पैशांच्या थैल्या रिकाम्या केल्या जात असल्याचा उघड आरोप होतो आहे.
दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचं पुनर्वसन करण्याचा शब्द खरा करून देण्याआधीच्या या खेळी आहेत. सुळेंच्या पुनर्वसनाचं अनुमान त्यांनी फेटाळलं असलं तरी ते अगदीच चुकीचं म्हणता येणार नाही. रोहित पवारांच्या आरोपांना खोटं ठरवणं असो की पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेण्याची सूचना असो, सुप्रिया यांची चाल ही कोणत्या वळणाची आहे, हे आता सगळ्यांनाच कळून चुकलंय.
याला घात म्हणतात. जो पवारांनी समाजवादाच्या नावाखाली महाराष्ट्राच्या माथी मारला, असा आरोप आजचे सत्ताधारी कायम करत आले. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पाडणार्या सत्ताधार्यांनी तेव्हा पवारांच्या फोडाफोडीच्या कृतीने अनेक दाखले दिले आहेत. वसंतदादा पाटील यांची सत्ता उलथून लावण्याची कृती असो की पुलोद निर्मितीचा निर्णय असो, सत्ता दिसेल तिथे वाकण्याची नीती पवारांनीच जोपासल्याचं भाजपवाले सांगत आहेत. सत्तेविना ज्यांना दिवस कंठता येत नाहीत, ते अशा मार्गांचा वापर करतात. जो आज शरद पवार आणि त्यांच्या कन्यका सुप्रिया यांनी अनुसरला आहे.
मतदारसंघ पुनर्रचना विधेयक याआधी फेटाळताना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेल्या संशयात आज कोणताही बदल झालेला नाही. पुनर्रचनेत दक्षिणेकडील राज्यांची खासदार संख्या उत्तरेतील राज्यांइतकी वाढण्याची सरकारची तयारी नसतानाही विधेयकाला पाठिंबा देणं हे अपेक्षांच्या ओझ्याखालचं लक्षण असल्याचं स्पष्ट दिसतं.
मतदारसंघांच्या पुनर्रचनेची चर्चा पुन्हा सुरू झाल्यापासून सुप्रिया सुळे यांना राज्याच्या प्रमुख पदाची संधी देणं, शिवाय अर्थमंत्रालय त्या पक्षाकडे म्हणजे जयंत पाटील यांच्याकडे देण्याच्या चर्चा सुरू असताना त्यावर खुलासा करण्याची आवश्यकता सुळे यांना वाटू नये? उलट विशेष अधिवेशन काळात संसद सोडू नये, असा हुकूम काढत सुळे आणि त्यांच्या पक्षाने इंडिया आघाडीचा विश्वासघात केला आहे. या विधेयकाचे परिणाम काय होणार हे सारा देश जाणून असताना ते सुप्रिया सुळे यांना कळणार नसतील तर त्या भारतासारख्या संघराज्याची फसवणूक करत आहेत, असंच म्हणता येईल. २०१४ च्या सत्तेवेळी न मागता भाजपला बाहेरून पाठिंबा, २०१९ च्या सत्ता स्थापनेवेळी शिवसेनेला एकाकी पाडणार्या भाजपला बाहेरून पाठिंबा ही राजकारणाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लिहिलेली काळी पानं लोकं विसरलेली नाहीत. मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या विधेयकाच्या रूपाने पुन्हा रेखाटली जातील इतकंच.






